ती बोट 'दहशतवाद्यांचीच' - मनोहर पर्रीकर
By Admin | Updated: January 5, 2015 12:32 IST2015-01-05T11:06:49+5:302015-01-05T12:32:35+5:30
पोरबंदरजवळ स्फोट झालेली ती बोट 'दहशतवाद्यांचीच' असल्याचे परिस्थितीजन्य पुराव्यांवरून सिद्ध होत असल्याचा दावा संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला आहे.

ती बोट 'दहशतवाद्यांचीच' - मनोहर पर्रीकर
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - तटरक्षक दलाच्या जवानांनी केलेल्या पाठलागानंतर पोरबंदरजवळ स्फोट झालेली ती बोट 'दहशतवाद्यांचीच' असल्याचे परिस्थितीजन्य पुराव्यांवरून सिद्ध होत असल्याचा दावा संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला आहे. त्या बोटीत जर स्मगलर तर त्यांनी स्वत:हून स्फोट घडवलाच नसता असेही त्यांनी म्हटले आहे.
गुजरातमधील पोरबंदर येथे ३१ डिसेंबर रोजी पाकमधून संशयास्पद बोट आली होती. तटरक्षक दलाने या बोटीचा पाठलाग केला असता बोटीवरील चौघांनी बॉम्बस्फोट घडवून बोट उडवली. त्यानंतर देशावरील दहशतवादी हल्ला टळल्याचे सांगण्यात येत होते, मात्र पाकिस्तानने आपला त्या बोटीशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला होता. पाकच्या संशयास्पद बोटीवरील कारवाईवर काँग्रेसनेही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
मात्र संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ती बोट दहशतवाद्यांचीच असल्याचा दावा केला. सर्व साधारणपणे मच्छिमार मार्ग ठरलेला आहे, मात्र या बोटीचा मार्ग वेगला होता. जर त्या बोटीवर तस्कर असते तटरक्षक दलाच्या जवानांनी थांबण्याचा इशारा दिल्यानंतर ते थांबले असते आणि शरण आले असते. तस्करांनी स्वत:हून कधीच बोटीचा स्फोट घडवला नसता असे ते म्हणाले. त्यामुळे बोटीवर तस्कर किंवा मच्छिमार नव्हते हे स्पष्ट होते. तसेच तटरक्षक दलाने या बोटीवर १२ - १४ तास लक्ष ठेवले होते. त्या बोटीवरील व्यक्तींचा संवाद संशयास्पद होता, असेही पर्रीकर यांनी स्पष्ट केले.
मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न असल्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कट भारतीय सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे टळला. अजमल कसाब व त्याच्या साथीदारांनी ज्या प्रकारे भारतात प्रवेश केला त्याच पद्धतीने भारतात घुसखोरी करणारी दहशतवाद्यांची बोट भारतीय तटरक्षक दलाने शुक्रवारी थांबवली. मात्र, वरकरणी मच्छिमारांची बोट वाटत असलेल्या या बोटीवर आत्मघातकी स्फोट घडवण्यात आले.