गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 06:12 IST2025-10-17T06:12:20+5:302025-10-17T06:12:32+5:30
नव्या मंत्रिमंडळाचा आज गांधीनगर येथे शपथविधी, किमान दहा नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी

गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
गांधीनगर : भाजपचे सरकार असलेल्या गुजरातमध्ये गुरुवारी वेगाने राजकीय हालचाली घडल्या. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व १६ मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. शुक्रवारी सकाळी गांधीनगरमध्ये सकाळी ११.३० वाजता नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यात काेणाला संधी मिळते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, मंत्रिमंडळ विस्तारात सुमारे १० नवीन मंत्री मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात, सध्याच्या मंत्रिमंडळातील जवळपास निम्मे मंत्री बदलले जाऊ शकतात. तसेच मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असून, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आमदारही मंत्री होऊ शकतात अशी चर्चा आहे.
गुजरात मंत्रिमंडळाची रचना
२७ मंत्री संविधानानुसार नियुक्त करता येतात. (सभागृहाच्या एकूण संख्येच्या १५ टक्के)
गतकाळातील धक्कातंत्र २०२१ मध्ये मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ बदलले, त्यानंतर भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री झाले.
पाटीदार आणि ठाकोर समाजाला मंत्रिमंडळात प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरुवारी रात्री गुजरातमध्ये पोहोचले असून भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा उद्या शुक्रवारी सकाळी गुजरातमध्ये येणार आहेत.
२०२७च्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपची खास रणनीती
मागील ३ वर्षांत गुजरातच्या मंत्रिमंडळात कोणताही बदल झालेला नाही. आता २०२७च्या विधानसभा निवडणुकांची तयारी म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे.
अनेक मंत्र्यांचे कामकाज समाधानकारक नव्हते. विशेषतः विसावदर विधानसभा पोटनिवडणुकीत आपचा उमेदवार विजयी झाला. या अपयशातून भाजपने धडा घेतला व राजकीय धक्कातंत्र वापरत गुजरातमध्ये मंत्रिमंडळामध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला.
भाजपतील गुजरातमधील जुन्या, प्रभावशाली व काही काळ बाजूला ठेवण्यात आलेल्या नेत्यांना पुन्हा जबाबदारी देण्याची शक्यता आहे. सत्ताविरोधी लाट टाळण्यासाठी मंत्रिमंडळात बदल करणे भाजप पक्षश्रेष्ठींना आवश्यक वाटले.