'मोदीजी, तुमचेच उपमुख्यमंत्री पुलवामा हल्ल्याला अपघात म्हणताहेत'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 04:15 PM2019-03-06T16:15:58+5:302019-03-06T16:18:16+5:30

व्हिडीओ रिट्विट करत दिग्विजय सिंह यांचा पंतप्रधानांवर निशाणा

BJPs KP Maurya calls Pulwama an accident Digvijaya Singh asks PM modi Anything to say | 'मोदीजी, तुमचेच उपमुख्यमंत्री पुलवामा हल्ल्याला अपघात म्हणताहेत'

'मोदीजी, तुमचेच उपमुख्यमंत्री पुलवामा हल्ल्याला अपघात म्हणताहेत'

googlenewsNext

नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला अपघात म्हणून त्याबद्दल संशय व्यक्त करणारे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर भाजपानं सडकून टीका केली. केंद्रीय मंत्र्यांसह भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी दिग्विजय यांच्यावर तोफ डागली. या टीकेला आता दिग्विजय सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दोन आठवड्यांपूर्वीच तुमच्याच एका वरिष्ठ नेत्यानं पुलवामातील हल्ल्याला अपघात म्हटलं होतं. याबद्दल मोदीजी आणि त्यांच्या मंत्र्यांचं काय म्हणणं आहे, असा सवाल दिग्विजय यांनी ट्विटमधून उपस्थित केला आहे. 




काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते केशव प्रसाद मौर्य यांच्याबद्दलचा एक व्हिडीओ रिट्विट केला आहे. यामध्ये मौर्य यांनी पुलवामातील हल्ल्याचा उल्लेख 'मोठी दुर्घटना' असा केला आहे. या व्हिडीओवरुन दिग्विजय यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांना लक्ष्य केलं. 'मी पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला दुर्घटना म्हटल्यावर मोदीजींपासून त्यांच्या तीन मंत्र्यांपर्यंत सगळेजण मला पाकिस्तानचा समर्थक म्हणू लागले. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचं विधान ऐका. मोदीजी आणि त्यांच्या मंत्र्यांना याबद्दल काही म्हणायचं आहे का?' असा सवाल त्यांनी ट्विटमधून विचारला आहे. 




14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. सीआरपीएफचे अडीच हजार जवान बसेसमधून श्रीनगर जात असताना दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला घडवून आणला. ताफ्यातील एका बसला स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं धडक दिली. यामध्ये 40 जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर देशभरात संतापाची लाट होती. या हल्ल्याचा बदला म्हणून 26 फेब्रुवारीला हवाई दलानं मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील जैशचे तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्याचे पुरावे मागितल्यानं सध्या दिग्विजय सिंह यांच्यावर भाजपानं टीकेची झोड उठवली आहे. 

Web Title: BJPs KP Maurya calls Pulwama an accident Digvijaya Singh asks PM modi Anything to say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.