SC प्रवर्गाला साधण्यासाठी भाजपचा प्लॅन '84'! जाणून घ्या, काय आहे 'घर-घर चलो' अभियान?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 15:26 IST2023-03-08T15:24:38+5:302023-03-08T15:26:30+5:30
भारतीय जनता पक्षाने देशातील अनुसूचित जाती (SC) प्रवर्गाला आपलेसे करण्यासाठी खास प्लॅन तयार केला आहे.

SC प्रवर्गाला साधण्यासाठी भाजपचा प्लॅन '84'! जाणून घ्या, काय आहे 'घर-घर चलो' अभियान?
देशातील जवळपास सर्वच पक्ष आता लोकसभानिवडणूक 2024 च्या तयारीला लागले आहेत. या निवडणुकीसाठी भाजपनेही कंबर कसली आहे. भारतीय जनता पक्षाने देशातील अनुसूचित जाती (SC) प्रवर्गाला आपलेसे करण्यासाठी खास प्लॅन तयार केला आहे. अनुसूचित जातींपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपकडून 'घर घर चलो' अभियान राबविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. महत्वाचे म्हणजे लोकसभेच्या 543 जागांपैकी 84 जागा SC प्रवर्गासाठी राखीव आहेत. यांपैकी, 60-70 जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, देशातील 18 टक्के अनुसूचित जातींना आकर्षित करण्यासाठी भाजप 21 दिवसांचे राष्ट्रव्यापी अभियान सुरू करणार आहे. पक्षाने डॉक्टर बाबासाहेब अंबेडकरांची जयंती अर्था 14 एप्रिलपासून घर घर चलो कार्यक्रमाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपच्या एससी मोर्चाचे प्रमुख लाल सिंह आर्य म्हणाले, या अभियानाच्या माध्यमाने केंद्रीय योजना लोकांपर्यंत पोहोचविल्या जातील. एवढेच नाही तर, मोर्चाची टीम योजनांच्या लाभासाठी लोकांना अर्ज करण्यासही मदत करेल. या अभियानाच्या माध्यमाने भाजप एससी प्रवर्गापर्यंत केंद्र सरकारच्या योजनांचे फायदे पोहोचविण्याची तयारी करत आहे. यादरम्यान योजनांच्या पायद्यांपासून वंचित राहिलेल्या लोकांना तत्काळ मदद पुरविली जाईल.
या अभियानाची सांगता दिल्लीतील ताल कटोरा स्टेडियमवर मोठ्या कार्यक्रमाचे आयोजित करून केली जाईल. तसेच यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत SC प्रवर्गासाठी राखीव असलेल्या 84 जागांपैकी 46 जागा जिंकल्या होत्या.