भाजपाचे ख्रिश्चन समुदायाला जेरुसलेमच्या मोफत दौऱ्याचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 13:46 IST2018-02-14T13:10:52+5:302018-02-14T13:46:33+5:30
जेरुसलेमची मोफत दौऱ्याची भेट केवळ नागालँडमधील ख्रिश्चन लोकांसाठी आहे की सर्व भारतीय ख्रिश्चनांसाठी आहे याबाबत कोणतीही माहिती स्पष्ट झालेली नाही.

भाजपाचे ख्रिश्चन समुदायाला जेरुसलेमच्या मोफत दौऱ्याचे आश्वासन
नवी दिल्ली- मुस्लीम समुदायाला हज भेटीसाठी देण्यात येणारी सबसिडीरुपी मदत बंद करण्याचा निर्णय घेऊन एक महिना होण्याच्या आतच भाजपाने एक नवा निर्णय घेतला आहे. नागालँडमध्ये सत्तेमध्ये आल्यास ख्रिश्चनधर्मियांना जेरुसलेमची मोफत भेट घडवू असे आश्वासन भाजपाने दिल्याचे ईशान्य भारतातील वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केले आहे.
मात्र ही जेरुसलेमची मोफत दौऱ्याची भेट केवळ नागालँडमधील ख्रिश्चन लोकांसाठी आहे की सर्व भारतीय ख्रिश्चनांसाठी आहे याबाबत कोणतीही माहिती स्पष्ट झालेली नाही. सध्या मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांच्या निवडणुकांचा प्रचार सुरु आहे. मेघालयमध्ये 75 टक्के जनता ख्रिश्चन धर्मिय आहे. नागालँडच्या एकूण लोकसंख्येपैकी 88 टक्के लोक ख्रिश्चन आहेत.
ख्रिश्चन लोकांना जेरुसलेमची मोफत भेट घडवण्याचे आश्वासन दिल्याचे "वुइदनागाज" या वृत्तसंस्थेने ट्वीट केले आहे तर यूएनआय वृत्तसंस्थेने ही घोषणा नागालँडच्या ख्रिश्चन धर्मियांसाठी केल्याचे वृत्त दिले आहे. भाजपाच्या या आश्वासनावर आता चोहोबाजूंनी टीका होत आहे. भाजपा केवळ संधीसाधू आणि ढोंगी राजकारण करत असल्याची टीका समाजमाध्यमांमध्ये केली जात आहे. एआयएमआयएमचे नेते असादुद्दिन ओवेसी यांनीही भाजपाच्या या निर्णयावर टीका केली आहे.
‘Jerusalem calling’ in Nagaland https://t.co/yR0rEmlhi3 via @the_hindu BJP promise to send Christians on a free trip,I was right BJP continues with Subsidy if it suits its electoral needs this is “ INDIA first”
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 13, 2018
हजयात्रेची सबसिडी रद्द करताना केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले होते, ''अल्पसंख्यांकांचे सक्षमीकरण त्यांच्या लांगुलचालनापेक्षा त्यांना सन्मान देऊन करण्यावर भाजपाचा भर आहे. हज सबसिडीला लागणाऱ्या रकमेचा उपयोग मुलींच्या शिक्षणासाठी केला जाईल.'' त्यामुळे आता ख्रिश्चन समुदायाला दिलेल्या या आश्वासनामुळे ते आपल्या विधानावर कायम राहणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. इस्रायलमधील प्रमुख वृत्तपत्र "जेरुसलेम पोस्ट"च्या संकेतस्थळानेही भाजपाच्या या प्रचाराची दखल घेतली आहे. भारतातून इस्रायलमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक जातात. 2017 मध्ये भारतातून 58,000 लोकांनी इस्रायलला भेट दिली होती. 2015 च्या तुलनेमध्ये त्यांच्या संख्येत 58 टक्के इतकी मोठी वाढ झाल्याचे दिसून येेत.
Indian political parties woo voters with Israel trips https://t.co/p7ksVvYjehpic.twitter.com/fWqzg7iCIN
— The Jerusalem Post (@Jerusalem_Post) February 13, 2018