भाजपाची लढाई प्रादेशिक पक्षांशीच - रविशंकर प्रसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 05:47 IST2019-03-20T05:46:33+5:302019-03-20T05:47:06+5:30
पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार यात कोणतीही शंका नाही. आम्ही २०१४ पेक्षा जास्त जागा जिंकू. मोदी यांचे समर्पण व प्रामाणिकपणाबद्दल सामान्य लोकांमध्ये असलेला विश्वास हाच आमची शक्ती आहे.

भाजपाची लढाई प्रादेशिक पक्षांशीच - रविशंकर प्रसाद
- संतोष ठाकूर
भाजपाला यंदा कमी जागा मिळण्याची चर्चा आहे...?
पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार यात कोणतीही शंका नाही. आम्ही २०१४ पेक्षा जास्त जागा जिंकू. मोदी यांचे समर्पण व प्रामाणिकपणाबद्दल सामान्य लोकांमध्ये असलेला विश्वास हाच आमची शक्ती आहे.
मग प्रत्येक राज्यात युती का?
ती आमच्या समरसतेचे प्रतीक आहे. आम्ही फक्त युती करतो असे नाही, तर एक समान मुद्दे असलेल्या पक्षाला एका व्यासपीठावर आणतो. समजूतदारीने सरकार चालविण्याचा विश्वास एक दुसऱ्याला देतो.
विरोधकांच्या आघाडीपेक्षा तुम्ही वेगळे कसे?
देशात विरोधकांची आघाडीच नाही. उत्तर प्रदेशात सपा—बसपाने काँग्रेसला बाहेर ठेवले आहे, बिहारमध्ये राजद व काँग्रेस यांच्यात तणाव आहेत. बंगालमध्ये तृणमूलने काँग्रेसला नाकारले आहे. ओडिशात बिजदशी काँग्रेसचा समझोता नाही.
काँग्रेसचे म्हणते की, त्यांची लढत भाजपाशी आहे?
काँग्रेसशी भाजपाची कुठेही थेट लढत नाही. काँग्रेस जिवंतच कुठे आहे? दिल्लीपासून ते दक्षिण व कच्छपासून ते नागालँडपर्यंत काँग्रेस अस्तित्वासाठी झगडत आहे. त्यामुळे आमची लढत आहे, ती प्रादेशिक पक्षांशीच. ईशान्य भारतात आम्ही स्थानिक पक्षांना हक्क मिळण्याची खात्री दिली. उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात समजूतदारपणा दाखविला. त्यामुळे भाजपाची युती अधिक प्रभावी, दूरगामी व परिपक्व आहे.
महाराष्ट्रात शिवसेना अडून बसली. उपमुख्यमंत्रीपद मागत आहे?
महाराष्ट्रात अडचण नव्हती. पक्षाध्यक्ष अमित शहा युती होईल, हे वारंवार सांगत होते, परंतु माध्यमे त्याला वेगळ्या रंगात दाखवत राहिली. आम्ही नैसर्गिक मित्र आहोत.
तुम्ही काँग्रेसला लढतीतून रद्द केले, परंतु प्रियांका गांधींसाठी लोक गर्दी करीत आहेत.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभांना कमी व प्रियांका गांधींच्या सभांना जास्त गर्दी होत आहे, तर त्याचे कारण काय, याचा विचार त्यांनीच करावा.
बिहारच्या पाटणा साहिबमधून तुमच्या उमेदवारीची चर्चा आहे.
मोदी यांनी ते पंतप्रधान बनल्यापासून सगळ्या नेत्यांना लोकांमध्ये जाऊन काम करण्यास सांगितले. त्यामुळे राज्यसभा आणि लोकसभेत अंतर राहिले नाही. मला आदेश मिळाल्यास मी निवडणूक लढवेन.
पाटणा साहिब हा शत्रुघ्न सिन्हा यांचा तो मतदारसंघ आहे.
मी आधीही कधी शत्रुघ्न सिन्हा यांच्याबद्दल काही बोललो नाही. आताही बोलणार नाही. एवढे म्हणेन की, मी पक्षादेश पाळेन.
पंतप्रधान महाराष्ट्रातील असेल, नितीन गडकरी यांचे नाव नाव आहे, याविषयी काय?
प्रसारमाध्यमे काहीही अंदाज करू शकतात, परंतु भाजपाबद्दल बोलायचे तर जागा कमी असो की जास्त, नरेंंद्र मोदी पंतप्रधान आहेत व राहतील. नितीन गडकरी यांनी मी पंतप्रधानपदाचा दावेदार नाही, हे स्पष्ट केले आहे
या निवडणुकीत मुद्दा काय असेल? राफेल, बेरोजगारी?
या निवडणुकीत एकच मुद्दा आहे व तो नरेंद मोदी. त्यांच्यासमोर इतर सगळे मुद्दे शून्य ठरतात.
राफेलबाबत... सर्व आरोप सर्वोच्च न्यायालय आणि कॅगने चुकीचे ठरवले, परंतु कोणी खोट्याला खरे ठरवू पाहात असेल, तर काय करणार? राहुल गांधींनी हे लक्षात घ्यावे की, जनतेचा आशीर्वाद नरेंद्र मोदी यांना आहे.
रोजगाराबाबत... डिजिटल इकॉनॉमी व आयटी क्षेत्रात आठ लाखांपेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण झाल्या. कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे लाखो रोजगार उपलब्ध झाले. ही आकडेवारी आमची नाही, तर उद्योगांनीच दिली आहे.