समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 07:13 IST2026-04-07T07:10:42+5:302026-04-07T07:13:01+5:30
‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर भाजपचा विश्वास

समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
हरिश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: समान नागरी संहिता (यूसीसी) आणि ‘वन नेशन, वन इलेक्शन’ हे भाजपचे दोन अजेंडे अद्याप पूर्ण झालेले नाहीत. त्यावर गांभीर्याने चर्चा सुरू असून सकारात्मक गोष्टी घडत आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले.
भाजपच्या ४७व्या स्थापना दिनानिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमात व्हर्च्युअल माध्यमातून केलेल्या भाषणात ते म्हणाले की, महिलांना आरक्षण देण्याचा मुद्दा प्रथम भाजपनेच १९९४ साली मांडला होता. सध्याचे भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकार लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारा महिला आरक्षण कायदा २०२९च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये लागू करण्यासाठी कटिबद्ध आहे. दडपशाहीसारख्या प्रसंगांना भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या सत्ताकाळात तोंड दिले.
‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर भाजपचा विश्वास
पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की अगदी युद्धाच्या काळातही भाजप “वसुधैव कुटुंबकम्” या तत्त्वावर विश्वास ठेवते. पूर्वी प्रत्येक देशापासून समान अंतर राखल्याबद्दल भारताला गर्व वाटायचा, पण आता भारत प्रत्येक देशासोबत उत्तम संबंध राखून आहे व पुढे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाच्या हितासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी काम करणारा ही एकमेव आघाडी आहे.