स्वामी अग्निवेश यांच्यावर हल्ला; भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी कपडे फाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 16:26 IST2018-07-17T16:17:51+5:302018-07-17T16:26:20+5:30
भाजयुमोच्या कार्यकर्त्यांची अग्निवेश यांच्याविरोधात घोषणाबाजी

स्वामी अग्निवेश यांच्यावर हल्ला; भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी कपडे फाडले
रांची: झारखंडच्या पाकुड जिल्ह्यात स्वामी अग्निवेश यांना भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. भाजपा कार्यकर्त्यांकडून स्वामी अग्निवेश यांच्या दौऱ्याचा निषेध सुरू असताना हा प्रकार घडला. यावेळी कार्यकर्त्यांनी 'अग्निवेश गो बॅक' अशा घोषणा दिल्या.
भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला काळे झेंडे दाखवून अग्निवेश यांचा निषेध केला. मात्र काही वेळातच कार्यकर्त्यांनी अग्निवेश यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी अग्निवेश यांना धक्काबुक्की करुन जमिनीवर पाडलं. यानंतर त्यांचे कपडे फाडले आणि पगडीदेखील काढली. यावेळी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम', 'अग्निवेश भारत छोडो', अशा घोषणा दिल्या.
Activist Swami Agnivesh was thrashed, allegedly by BJP Yuva Morcha workers in Jharkhand's Pakur, earlier today. More details awaited. pic.twitter.com/59kqoV9uj4
— ANI (@ANI) July 17, 2018
स्वामी अग्निनेश आज पाकुड जिल्ह्यातील लिट्टिपाडा येथे एका सभेला संबोधित करणार होते. भारतीय आदिवासी विकास समितीनं या सभेचं आयोजन केलं होतं. या सभेआधी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेतील त्यांच्या विधानानं भाजयुमोचे कार्यकर्ते नाराज झाले. अग्निवेश पत्रकारांना संबोधित करुन हॉटेलबाहेर पडत असताना कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. याआधी अग्निवेश पाकुड जिल्ह्यात दाखल होताच त्यांना संघ आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या निषेधाचा सामना करावा लागला होता.