'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 19:05 IST2025-11-08T19:03:43+5:302025-11-08T19:05:52+5:30
केंद्रशासित प्रदेशात एकूण ४८ जिल्हा पंचायत जागा आहेत, त्यापैकी भाजपने ३५ बिनविरोध जिंकल्या

'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
दीव दमन, दादरा नगर हवेली येथे झालेल्या स्थानिक निवडणुकीत भाजपाने सर्व प्रमुख जागांवर बहुमत मिळवत क्लीन स्वीप विजय मिळवला आहे. दमन जिल्हा पंचायतीत १६ पैकी १५ जागा, नगर परिषदेत १५ पैकी १४ जागा आणि सरपंचपदी १६ पैकी १५ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. त्याशिवाय दीव जिल्ह्यात जिल्हा पंचायतीत सर्व ८ जागा जिंकून भाजपाने विरोधकांना शह दिला आहे. दादरा नगर हवेली जिल्ह्यात पक्षाने दबदबा कायम ठेवत जिल्हा पंचायत निवडणुकीत २६ पैकी २४ जागा आणि नगर परिषदेत सर्व १५ जिंकल्या आहेत.
काँग्रेसने लावला आरोप
स्थानिक संस्था निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विजयानंतर काँग्रेसने दीव दमन दादरा नगर हवेली येथे चुकीच्या पद्धतीने विजय मिळवल्याचा आरोप केला आहे. भाजपाने एकूण १२२ जागांपैकी ९१ जागा म्हणजे ७५ टक्के जागा बिनविरोध जिंकल्या होत्या. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे या जागांवर भाजपा उमेदवाराविरोधात कुणीही उभे राहिले नव्हते. मात्र काँग्रेस उमेदवारांनी अर्ज भरूनही त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले असा आरोप काँग्रेसने केला. याबाबत काँग्रेसने मुंबई हायकोर्टातही याचिका दाखल केली आहे.

किती जागा जिंकल्या?
केंद्रशासित प्रदेशात एकूण ४८ जिल्हा पंचायत जागा आहेत, त्यापैकी भाजपने ३५ बिनविरोध जिंकल्या. पाच वर्षांपूर्वी ही संख्या फक्त नऊ होती. त्याचप्रमाणे, भाजपाने ४४ पैकी ३० ग्रामपंचायत जागा आणि ३० पैकी २६ नगरपालिका जागा बिनविरोध जिंकल्या आहेत.