तामिळनाडूत भाजपा मोठा धमाका करणार, सत्ताधारी डीएमकेच्या बड्या नेत्याचा मुलगा हाती कमळ घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 22:20 IST2022-05-08T22:19:57+5:302022-05-08T22:20:06+5:30
BJP In Tamilnadu: तामिळनाडूमध्ये अनेक वर्षे सक्रिय असूनही राज्यात भाजपाचे अस्तित्व किरकोळच आहे. मात्र आता राज्यात भाजपा मोठा धमाका करण्याची शक्यता आहे. तामिळनाडूत भाजपा मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे.

तामिळनाडूत भाजपा मोठा धमाका करणार, सत्ताधारी डीएमकेच्या बड्या नेत्याचा मुलगा हाती कमळ घेणार
चेन्नई - तामिळनाडूमध्ये अनेक वर्षे सक्रिय असूनही राज्यात भाजपाचे अस्तित्व किरकोळच आहे. मात्र आता राज्यात भाजपा मोठा धमाका करण्याची शक्यता आहे. तामिळनाडूत भाजपा मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. तामिळनाडूमधील सत्ताधारी डीएमकेचे बडे नेते आणि राज्यसभा खासदार त्रिची शिवा यांचा मुलगा भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्रिची शिवा यांचा मुलगा सूर्या लवकरत भाजपात दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूर्या यांचे वडील टी. शिवा डीएमकेकडून चौथ्यांदा राज्यसभेवर नियुक्त झाले आहेत. त्यांना २ मार्च २०२० रोजी राज्यसभेवर निवडून देण्यात आले होते. डीएमकेकडून चार वेळा राज्यसभेवर गेलेले ते एकमेव खासदार आहेत. १९९६ मध्ये पहिल्यांदा राज्यभेवर निवडून गेले होते. त्यानंतर २००२, २००७, २०१४ आणि २०२० मध्ये त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले.
त्रिची शिवा हे केंद्र सरकारचे कडवे विरोधक मानले जातात. तामिळनाडूमध्ये हिंदी शिकवणे अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा त्यांनी विरोध केला होता. असे करून केंद्र सरकार आगीशी खेळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
त्याशिवाय केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांनाही त्यांनी विरोध केला होता. तसेच त्यांनी या कायद्यांविरोधात सुप्रिम कोर्टात याचिकाही दाखल केली होती. तसेच हे कायदे असंवैधानिक आणि अवैध घोषित करण्याची मागणी केली होती.
अशा परिस्थितीत शिवा यांचे पुत्र सूर्या हे भाजपात दाखल झाले तर तामिळनाडूच्या राजकारणामध्ये ते भाजपासाठी मोठं यश असेल. तर डीएमकेसाठी हा मोठा धक्का असेल.