बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 14:35 IST2025-10-27T14:35:18+5:302025-10-27T14:35:36+5:30
भाजप बिहार प्रदेश मुख्यालय प्रभारी अरविंद शर्मा यांनी अधिकृत पत्र जारी करत या कारवाईची माहिती दिली.

बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाने अर्थात भाजपने शिस्तभंगाची कारवाई करत पक्षातील ४ नेत्यांना ६ वर्षांसाठी निलंबित केले आहे. एनडीएच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आणि पक्षविरोधी कारवाईत सहभागी असल्याचा आरोप करत भाजपने ही मोठी कारवाई केली आहे.
शिस्तभंग करणाऱ्यांना कठोर संदेश -
भाजप बिहार प्रदेश मुख्यालय प्रभारी अरविंद शर्मा यांनी अधिकृत पत्र जारी करत या कारवाईची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, संबंधित नेत्यांनी पक्षाचे धोरण आणि पक्षाच्या नियांचे उल्लंघन करून एनडीएच्या उमेदवारांविरोधात निवडणूक मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. "आपले हे कृत्य पक्षविरोधी असून, यामुळे संघटनेच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. शिस्तभंंगाची ही घटना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही," असे शर्मा यांनी पत्रात नमूद केले आहे.
कारवाई करण्यात आलेल्या नेत्यांची नावे --
१. पवन यादव (कहलगांव विधानसभा)
२. वरुण सिंह (बहादुरगंज)
३. अनूप कुमार श्रीवास्तव (गोपालगंज)
४. सूर्य भान सिंह (बडहरा)
या सर्व नेत्यांनी एनडीएच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.
बंडखोरी खपवून घेतली जाणार नाहीत -
अरविंद शर्मा यांनी म्हटले आहे की, "भाजप एक अतिशय शिस्तबद्ध संघटना आहे, संघटनेची विचारधारा आणि हित हे व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपेक्षा नेहमीच अधिक महत्त्वाचे मानले जाते." महत्वाचे म्हणजे, तिकीट वाटपाच्या मुद्द्यावर सर्वच पक्षांमध्ये असंतोष दिसत आहे. अनेक बंडखोर नेत्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशावेळी भाजपने तातडीने कठोर भूमिका घेत, पक्षाच्या शिस्तीपेक्षा कोणीही मोठे नाही आणि बंडखोरीला थारा दिला जाणार नाही, असा एक स्पष्ट संदेश दिला आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, या कारवाईच्या माध्यमाने भाजपने निवडणुकीपूर्वीच पक्षातील इतर असंतुष्ट नेत्यांनाही इशारा दिला आहे. निवडणुकीच्या काळात केवळ एनडीएचे अधिकृत उमेदवारच पक्षाचा चेहरा असतील, हे या निर्णयाने स्पष्ट झाले आहे.