भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 21:32 IST2025-10-21T21:32:05+5:302025-10-21T21:32:42+5:30
ही घटना १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० च्या सुमारास मेरठच्या तेजगढी येथील मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर घडली.

भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
मेरठ - उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे सत्तेच्या नशेत मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी पाहायला मिळाली. राज्यमंत्री डॉ. सोमेंद्र तोमर यांच्या निकटवर्तीय समर्थकांनी एका युवकाला अशाप्रकारे अपमानित केले ते पाहून अनेकांचा संताप अनावर होईल. व्हायरल व्हिडिओत युवकाला हात जोडून, डोके खाली ठेवत नाक घासून माफी मागण्यास भाग पाडले गेले. विशेष म्हणजे हा तमाशा सुरू असताना पोलीस हतबल झाल्याचे दिसून आले. मोबाईल कॅमेऱ्यात व्हिडिओ बनवण्याव्यतिरिक्त पोलिसांनी काहीच केले नाही. या घटनेतील मुख्य आरोपी विकुल चपराणा याला अटक करण्यात आली आहे तर इतरांचा शोध सुरू आहे.
ही घटना १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० च्या सुमारास मेरठच्या तेजगढी येथील मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर घडली. माहितीनुसार, एका पार्किंग वादातून २ युवकांना मंत्र्यांच्या समर्थकांनी घेरले. त्यांना धमकावत त्यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या. व्हायरल व्हिडिओत एक युवक कारजवळ बसून जमिनीवर नाक घासत हात जोडून माफी मागताना दिसतो. आजूबाजूला बघ्यांची गर्दी होती, त्यात पोलीस कर्मचारीही होते. यावेळी विकुल चपराणा नावाचा युवक जोरजोरात ओरडताना समोरील युवकाला धमकावत असतो, त्यात हाथ जोडकर बोल, सोमेंद्र तोमर तेरा बाप है, गलती हो गई..असं बोलतो. या व्हिडिओत युवक वारंवार माफी मागताना ऐकायला येत आहे. या घटनेवेळी बरेच लोक तिथे होते. त्याशिवाय १० हून अधिक पोलीस तिथे होते परंतु कुणीही हिंमत दाखवत या युवकांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. हे समर्थक भाजपा मंत्र्यांच्या नावाने युवकांना धमकावत होते.
नेमकं काय घडले?
कंकरखेडा येथील २ युवक त्यांच्या कारमध्ये बसले होते. त्याचवेळी चौधरी चरण सिंह यूनिवर्सिटीतील विद्यार्थी नेता आणि भाजपा किसान मोर्चाचा मेरठ जिल्हा उपाध्यक्ष विकुल चपराणा आणि त्याचे सहकारी तिथे पोहचले. सुरुवातीला त्यांनी युवकांना शिवीगाळ केली, त्यानंतर काठीने कारच्या पाठिमागची काच फोडली. दुसऱ्याने समोरची काच बुक्की मारून फोडली. गर्दीत उभे असलेले पोलीस हा तमाशा उघड्या डोळ्याने पाहत होते परंतु भाजपा नेत्याची गुंडगिरी रोखण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. जेव्हा विकुलने जबरदस्तीने माफी मागायला लावली आणि राज्यमंत्र्यांच्या नावाने युवकांना वारंवार अपमानित करत राहिले तेव्हा इतर व्हिडिओ बनवत होते असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
१९ सेकंदचा व्हिडिओ बनला पुरावा
अवघ्या १९ सेकंदचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आणि त्यानंतर सगळीकडे खळबळ माजली. पोलिसांच्या भूमिकेवर लोकांनी संताप व्यक्त केला. राजकीय नेत्यांच्या दबावाखाली माणुसकीला काळिमा फासण्यात आला असा आरोप लोकांनी केला. लोकांकडून दबाव वाढताच पोलीस अधीक्षकांनी या प्रकाराची दखल घेत चौकशीचे आदेश दिले. जे कुणी यात दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. या प्रकारावर राज्यमंत्री सोमेंद्र तोमर यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सध्या या घटनेतील समर्थक गुंडांचे आणि सोमेंद्र तोमर यांचे फोटो व्हायरल होत आहेत.