BJP is the slave party of AIADMK; DMK criticism | अण्णाद्रमुक हा भाजपचा गुलाम पक्ष; द्रमुकची टीका

अण्णाद्रमुक हा भाजपचा गुलाम पक्ष; द्रमुकची टीका

नवी दिल्ली  - तामिळनाडूचे सरकार सर्वात भ्रष्ट असून अण्णाद्रमुक हा भाजपचा गुलाम वा मांडलिक बनलेला पक्ष आहे, अशी बोचरी टीका द्रमुकने लोकसभेत केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेल्या अभिभाषणासंदर्भात अभिनंदनाच्या ठरावावरील चर्चेत द्रमुकचे नेते दयानिधी मारन यांनी हे शरसंधान केले.

ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकांमध्ये तामिळनाडूतील जनतेने आपल्याला का नाकारले याचे भाजपने आत्मपरीक्षण केले पाहिजे. देशातील विरोधी पक्ष दुर्बळ असल्यानेच भाजपचे फावले आहे.

तामिळनाडूमध्ये लोकसभा निवडणुकीत अण्णाद्रमुकचा फक्त एकच खासदार निवडून आला होता. मारन यांनी केलेल्या घणाघाती टीकेला लोकसभेत भाजप सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. तामिळनाडूतील राज्य सरकारविरोधात दयानिधी मारन यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप भाजपने केला.

भाजप-अण्णाद्रमुक यांची युती असून त्या अनुषंगाने मारन म्हणाले की, गुलामांची (अण्णाद्रमुक) काळजी घेणे हे मालकाचे (भाजप) कर्तव्य असते. या उद्गारांना संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी आक्षेप घेतला. तपास यंत्रणा तसेच निवडणूक आयोगाचा भाजपकडून गैरवापर सुरूआहे, असा आरोप द्रमुकने केला आहे. अण्णाद्रमुक भाजपच्या वळचणीला गेला होता, तर द्रमुकने काँग्रेसशी युती करून लोकसभा निवडणुका लढविल्या.

बेपर्वा राज्य सरकार

द्रमुकने आरोप केला की, तामिळनाडूमध्ये विशेषत: चेन्नई शहरामध्ये सध्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. या संकटकाळात अण्णाद्रमुक सरकार अत्यंत बेपर्वाईने वागत आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी सरकारने फारसे हातपाय हलविलेले नाहीत.
भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात सांगितले होते. त्याची आठवण देऊन दयानिधी मारन म्हणाले की, तामिळनाडूचे सरकार सर्वात भ्रष्ट आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: BJP is the slave party of AIADMK; DMK criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.