जेपी नड्डा, अश्विनी वैष्णव यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर; भाजपा यादीत आणखी कोणाची नावे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 15:18 IST2024-02-14T15:18:06+5:302024-02-14T15:18:20+5:30
BJP Candidate List For Rajya Sabha Election 2024: भाजपाने मध्य प्रदेश, गुजरात आणि ओडिसा येथून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.

जेपी नड्डा, अश्विनी वैष्णव यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर; भाजपा यादीत आणखी कोणाची नावे?
BJP Candidate List For Rajya Sabha Election 2024: संसदेतील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. १५ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून आता उमेदवारी जाहीर केली जात आहे. काँग्रेसनंतर आता भाजपानेही काही राज्यांमध्ये आपले राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, विद्यमान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेकांची वर्णी राज्यसभेसाठी लागली आहे.
मध्य प्रदेश, गुजरात, ओडिसा यांसह महाराष्ट्रातूनही राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. गुजरातमधून जेपी नड्डा, गोविंदभाई ढोलकिया, मयंकभाई नायक आणि जशवंतसिंह सलामसिंह परमार अशा चार जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मध्य प्रदेशमधून डॉ. एल. मुरुगन, उमेशनाथ महाराज, माया नरोलिया आणि बंसीलाल गुर्जर यांना राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कोण आहेत बालयोगी उमेशनाथ महाराज? भाजपाने दिली राज्यसभेची उमेदवारी
अशोक चव्हाणांचा भाजपात प्रवेश आणि राज्यसभा उमेदवारी
महाराष्ट्रातील राज्यसभा उमेदवारांची नावे भाजपाने जाहीर केली आहेत. यामध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांना राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाणांसह मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. ओडिसामधून अश्विनी वैष्णव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाने विश्वास दाखवल्याबाबत अश्विनी वैष्णव यांनी पक्षनेतृत्व आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. दुसरीकडे काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या मिलिंद देवरा यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनेही आपली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. राजस्थान येथून सोनिया गांधी, बिहारमधून अखिलेश प्रसाद सिंह, हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनु सिंघवी आणि महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.