भाजपाच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीचा मुहुर्त अखेर ठरला, अशी आहे संघटनेची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 11:52 IST2025-01-19T11:50:46+5:302025-01-19T11:52:12+5:30
BJP President Election Update: भाजपाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड मागच्या वर्षभरापासून विविध कारणांमुळे रखडलेली आहे. मात्र आता भाजपाला आपल्या नव्या अध्यक्षांची निवड करण्यासाठीचा मुहुर्त सापडला असल्याचं वृत्त आहे.

भाजपाच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीचा मुहुर्त अखेर ठरला, अशी आहे संघटनेची तयारी
भाजपाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड मागच्या वर्षभरापासून विविध कारणांमुळे रखडलेली आहे. मात्र आता भाजपाला आपल्या नव्या अध्यक्षांची निवड करण्यासाठीचा मुहुर्त सापडला असल्याचं वृत्त आहे. नव्या अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया ही फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा पक्षसंघटनेला आहे. दिल्ली विधानसभेची निवडणूक आटोपल्यानंतर भाजपाला नवा अध्यक्ष मिळेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
दिल्लीमध्ये ५ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे. तसेच ८ फेब्रुवारी रोजी या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे. अशा परिस्थितीत भाजपाचं पूर्ण लक्ष्य हे दिल्ली विधानसभा निवडणुकीवर आहे. तसेच दिल्ली जिंकण्यासाठी पक्षाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भाजपा जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखालीच दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार हे निश्चित आहे.
पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १० फेब्रुवारीपासून २० फेब्रुवारीदरम्यान, भाजपाच्या नव्या अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे. सध्या भाजपामध्ये संघटनेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. तसेच विभाग, जिल्हा आणि प्रदेश अध्यक्षांची निवड केली जात आहे.
त्याशिवाय राष्ट्रीय परिषद आणि प्रदेश परिषदेचे सदस्यही निवडले जात आहेत. ते राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. मात्र आतापर्यंत केवळ चार राज्यांमधील प्रदेश अध्यक्षांचीच निवड झाली आहे.
भाजपाच्या घटनेनुसार राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी किमान ५० टक्के पक्ष संघटनेच्या निवडणुका पूर्ण होणं आवश्यक आहे. भाजपा नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार संघटनेची निवडणूक सुरू आहे. तसेच ती वेळीच पूर्ण होणार आहे. संघटनेच्या मते महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीमुळे भाजपाचं सदस्य नोंदणी अभियान उशिराने सुरू झालं.