होय, 'त्यांची' तिकिटं माझ्या सांगण्यावरून कापली! पंतप्रधान मोदींनी भाजप नेत्यांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 12:36 PM2022-03-15T12:36:51+5:302022-03-15T12:39:09+5:30

भाजप नेत्यांच्या, खासदारांच्या बैठकीत मोदींचा स्पष्ट शब्दांत इशारा

bjp parliamentary party meeting pm modi gives strong message to party member | होय, 'त्यांची' तिकिटं माझ्या सांगण्यावरून कापली! पंतप्रधान मोदींनी भाजप नेत्यांना सुनावले

होय, 'त्यांची' तिकिटं माझ्या सांगण्यावरून कापली! पंतप्रधान मोदींनी भाजप नेत्यांना सुनावले

Next

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. घराणेशाही जपणारे पक्ष देशाचं नुकसान करत आहे. आपण घराणेशाहीच्या विरोधात लढतो, म्हणून जनता आपल्या पाठिशी उभी राहते, याची आठवण मोदींनी भाजपच्या खासदारांना करून दिली. 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या खासदार रिटा बहुगुणा जोशी त्यांच्या मुलाला तिकीट मिळावं यासाठी आग्रही होत्या. रिटा बहुगुणा जोशी प्रयागराजच्या खासदार आहेत. मुलगा मयांक जोशीला लखनऊमधून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. त्यानंतर मयंक जोशी यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. विशेष म्हणजे रिटा बहुगुणा जोशी या काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्या आहेत.

पक्षात घराणेशाही चालणार नाही. आपण इतर पक्षांमधील घराणेशाही विरोधात लढा देतो. त्याआधी आपल्याला आपल्या पक्षातील घराणेशाहीशी लढावं लागेल, अशा शब्दांत मोदींनी भाजपच्या नेत्यांना आणि खासदारांना कठोर संदेश दिला. भाजपच्या नेत्याच्या, खासदाराच्या कुटुंबीयांना उमेदवारी मिळाली नसल्यास तो निर्णय माझ्या सांगण्यावरून झाला आहे, असं म्हणत मोदींनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

दिल्लीतल्या आंबेडकर भवनात भाजपच्या संसदीय दलाची बैठक सुरू आहे. पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर होत असलेल्या बैठकीत उत्तराखंड आणि मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदी कोणाची निवड करायची याबद्दलचा निर्णय होऊ शकतो. या बैठकीत मोदींनी भाजपनं गमावलेल्या जागांबद्दल महत्त्वाच्या सूचना दिल्या. ज्या मतदारसंघांमध्ये भाजपचा पराभव झाला, त्यामागची कारणं शोधून काढण्याची जबाबदारी खासदारांना देण्यात आली आहे. खासदारांनी पराभवाची कारणमिमांसा करून अहवाल तयार करावा. त्यानंतर त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असं मोदी म्हणाले.

Web Title: bjp parliamentary party meeting pm modi gives strong message to party member

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.