'लेटरकांड'नंतर गुजरातमध्ये भाजपा बॅकफूटवर; वादात अडकलेले कोण आहेत कौशिक वेकरिया?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:54 IST2025-01-09T15:53:04+5:302025-01-09T15:54:02+5:30
मागील काळात भाजपाच्या अंतर्गत वादातून अमरेली जिल्ह्यात एका तालुका प्रमुखाच्या नावाने बनावट लेटर व्हायरल झाले होते.

'लेटरकांड'नंतर गुजरातमध्ये भाजपा बॅकफूटवर; वादात अडकलेले कोण आहेत कौशिक वेकरिया?
अहमदाबाद - भाजपाचा सर्वात मजबूत गड मानल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये सध्या अमरेली लेटरकांड मुद्दा चांगलाच गाजत आहे. काँग्रेस नेते परेश धनानी यांनी पाटीदार समाजातील मुलीच्या अत्याचाराचा विषय उचलून स्वाभिमान आंदोलन सुरू केले आहे. हा मुद्दा शमण्याची चिन्हेही दिसत नाहीत. या वादात भाजपा बॅकफूटवर गेली असून त्याच्या केंद्रस्थानी भाजपा आमदार कौशिक वेकरिया हे आहेत. कौशिक वेकरिया राज्य भाजपाच्या युवा आमदारांपैकी एक आहेत.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत अमरेली मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज नेते परेश धनानी यांचा पराभूत केल्यानंतर वेकरिया डेप्युटी व्हिपपदी नियुक्त केले होते परंतु अमरेली लेटरकांडनंतर ज्यारितीने पाटीदार अँगलची एन्ट्री झाली आहे ज्यात केवळ वेकरिया नाही तर भाजपाला बॅकफूटवर आणलं आहे. राजकीय वर्तुळात हा मुद्दा गाजत असला तरी वेकरिया यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. अमरेली जिल्ह्यात ५ विधानसभा जागेसह लोकसभा मतदारसंघही भाजपाच्या ताब्यात आहे. काँग्रेसचे गड समजले जाणारे हे मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपाने ३८ वर्षीय वेकरिया यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती.
मागील काळात भाजपाच्या अंतर्गत वादातून अमरेली जिल्ह्यात एका तालुका प्रमुखाच्या नावाने बनावट लेटर व्हायरल झाले होते. त्यात वेकरिया यांच्यावर खंडणीचा आरोप लावला होता. बनावट लेटर बनवण्याचा आरोप माजी तालुका प्रमुख मनिष वगासिया यांच्यावर होता. या प्रकरणी पोलिसांनी ४ लोकांना अटक केली होती. त्यात वगासिया यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या पाटीदार समाजाच्या पायल गोटीलाही अटक झाली. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने पाटीदार समाजाच्या स्वाभिमानाशी हा मुद्दा जोडला आहे. एक मुलगी जी टायपिस्ट आहे तिच्यासोबत गुन्हेगारासारखं वागणूक होतेय. पाटीदार समाजाच्या मुलीसोबत अशा प्रकरणी वागणूक कौशिक वेकरिया यांच्या सांगण्यावरून होतेय असा आरोप काँग्रेसने केला.
दरम्यान, पोलिसांनी पायल गोटी या मुलीला मारहाण केली असा दावा केला जात आहे. आता हे प्रकरण हायकोर्टात पोहचले आहे. अमरेली पोलीस अधीक्षख यांच्या नेतृत्वात या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी. कौशिक वेकरिया यांनीही लेटरकांडविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. अमरेलीतील या प्रकरणामुळे भाजपा नाराज आहे. गुजरातमध्ये पाटीदार समाजाचा मुद्दा येणाऱ्या काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे. यात विरोधी पक्षाकडून सरकारविरोधात आणखी आंदोलन केली जात आहेत.