BJP on Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आहे. निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीतील अनियमिततेबाबत आयोगाव गंभीर प्रश्नही उपस्थित केले आहेत. यावरुन आता भारतीय जनता पक्षाने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिले.
संबित पात्रा म्हणाले, राहुल गांधी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन गोष्टी स्पष्टपणे दिसून येतात. एक- तांत्रिक आणि दुसरा- राजकीय. तांत्रिक प्रश्न निवडणूक आयोगाशी संबंधित असू शकतात, परंतु राहुल गांधींचा खरा हेतू राजकीय होता. जेव्हा राहुल गांधी जिंकतात, तेव्हा त्यांना निवडणूक आयोगात कोणतीही अनियमितता दिसत नाही. पण, जेव्हा त्यांचा पराभव होतो, तेव्हा याच संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.
तुम्ही जिंका तेव्हा घोटाळा नसतो, अन्...देशातील जनताही हे पाहत आहे. जेव्हा तुम्ही हिमाचल प्रदेशात जिंकता, तेव्हा तुम्ही असे म्हणत नाही की, निवडणूक आयोगाने चांगले काम केले. त्यावेळी तुम्हाला कोणताही घोटाळा दिसत नाही. तुम्ही साधे अभिनंदनही करत नाही. त्यावेळी तुम्ही तटस्थ राहता. तेलंगणात तुमचा मुख्यमंत्री निवडला जातो, भाजप हरतो. त्यावेळी राहुल गांधींनी तेलंगणात निवडणूक आयोगाने घोटाळा केल्याचे म्हटले नाही. लोकसभा निवडणुकीत तुम्हाला ९९ जागा मिळाल्यावर तुम्ही आनंद साजरा करता आणि आम्ही जिंकलो असे म्हणता. जर देशाची लोकशाही हरली असेल तर तुम्ही कशाचा आनंद साजरा करताय? असा प्रश्न पात्रा यांनी उपस्थित केला.
न्यायालयात का गेला नाही?संबित पात्रा पुढे म्हणाले, आज राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे निवडणूक आयोगाला धमकी दिली की, जर उत्तर मिळाले नाही, तर 'घातक परिणाम' भोगावे लागतील. त्यांनी असेही म्हटले की, भविष्यात जेव्हा विरोधी पक्ष सत्तेवर येईल, तेव्हा एकाही अधिकाऱ्याला सोडले जाणार नाही. ही भाषा विरोधी नेत्याची नाही, तर दबावाचे राजकारण करणाऱ्या नेत्याची आहे. राहुल गांधींकडे पुरावे होते, तर त्यांनी न्यायालयात का धाव घेतली नाही? राहुल निवडणूक आयोगात का गेले नाहीत?
नोव्हेंबर २०२४ मध्ये राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणुकीबाबत आक्षेप नोंदवला होता, तेव्हा निवडणूक आयोगाने डिसेंबरमध्येच एक पत्र लिहून भेटण्याचे आवाहन केले होते. महाराष्ट्रात काँग्रेसकडे २८४२० बीएलए होते, तेव्हा त्यांनी आक्षेप का नोंदवला नाही? निवडणूक आयोगाने राहुल गांधींना आक्षेप नोंदवण्यासाठी सर्व प्रकारची सुविधा दिली होती, पण त्यांनी तसे केले नाही. आजही निवडणूक आयोगाने एक पत्र जारी केले आहे. निवडणूक आयोगाने राहुल गांधींना सांगितले की, तुम्ही सादर केलेल्या डेटाची चौकशी करण्यास आम्ही तयार आहोत, परंतु तुम्ही हे सर्व पुरावे प्रतिज्ञापत्रासह द्यावेत. यावर राहुल गांधी म्हणतात की, माझे शब्दच माझी शपथ आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयावरही प्रश्न उपस्थित केले. हे भाऊ-बहीण दोघेही हुकूमशहा आहेत, अशी घणाघाती टीकाही संबित पात्रा यांनी यावेळी केली.