भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक; जेपी नड्डा म्हणाले- 'यावर्षी 9 राज्यांच्या निवडणुका जिंकाव्याच लागतील...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 19:33 IST2023-01-16T19:24:11+5:302023-01-16T19:33:55+5:30
या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीवरही चर्चा झाली.

भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक; जेपी नड्डा म्हणाले- 'यावर्षी 9 राज्यांच्या निवडणुका जिंकाव्याच लागतील...'
नवी दिल्ली: आज भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक राजधानी दिल्लीत झाली. या बैठकीसाठी देशभरातील पक्षाचे अनेक महत्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. बैठकीत पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आगामी विधानसभा निवडणुकांवर भाष्य केलं. आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू करावी लागेल आणि यावर्षी 9 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत पक्षाने 2024 ची रुरेषा तयार केली आहे. लोकसभा निवडणुकीत विजय नोंदवायचा असेल, तर त्याची सुरुवात या वर्षी होणाऱ्या 9 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपासून करावी लागेल, यावर जोर देण्यात आला आहे.
जेपी नड्डा बैठकीत काय म्हणाले?
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत जेपी नड्डा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे जगभरात भारतीय लोकांचा आदर वाढला आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका होतात, तिथे पक्ष संघटनेत जो काही बदल करत असतो, त्याचे परिणाम निवडणुकीच्या निकालात दिसायला हवेत. बैठकीनंतर रविशंकर प्रसाद यांनीही अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली आहे. ते म्हणाले की, कमकुवत बूथ मजबूत करण्यासाठी 72 हजारांची ओळख पटवली. लोकसभेचे 100 आणि विधानसभेचे 25 बूथ ओळखले गेले आहेत. तसेच, पक्ष 1 लाख 30 हजार बुथवर पोहोचला आहे, असेही ते म्हणाले.
कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?
हिमाचलमधील पराभवावरही बैठकीत चर्चा झाली. त्यावर प्रसाद म्हणाले की, आम्हाला तिथली प्रथा बदलायची होती, पण बदलू शकलो नाहीत. पूर्वी 5 टक्क्यांहून अधिक फरक असायचा, पण यावेळी तो 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. सुमारे 37 हजार कमी मते मिळाली. राम मंदिराबाबतही रविशंकर प्रसाद यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भव्य राम मंदिर बांधणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या परंपरा आणि मंदिरावर चर्चा केली. याच परंपरेने राम मंदिर उभारले जात आहे, असे ते म्हणाले.
दिल्लीत पंतप्रधानांचा रोड शो
भाजपची ही राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक अनेक अर्थांनी विशेष ठरली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेपूर्वी रोड शो काढला. त्या 15 मिनिटांच्या रोड शोला जनतेने दिलेल्या पाठिंब्यामुळे पक्षाचा उत्साह वाढला आहे. बैठकीदरम्यानही पक्षाचे संपूर्ण लक्ष केवळ आणि केवळ निवडणूक जिंकण्यावरच राहिले. 2024 ची लढाई तर दूरच, पण पक्षाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.