सोमवारी लोकसभेत (Lok Sabha) जवळपास सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी देशातील रस्ते पायाभूत सुविधांच्या विकासासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे कौतुक केले. यासोबतच रस्त्यांच्या दर्जा आणि देखभालीच्या मुद्द्यावरही प्रश्न उपस्थित करून टोलवसुलीत पारदर्शकता नसल्याचा आरोपही करण्यात आला. चर्चेदरम्यान भाजप खासदारानं गडकरी यांचा उल्लेख स्पायडरमॅन असाही केला.
'२०२२-२३ या वर्षासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील अनुदानाच्या मागण्या' या विषयावर लोकसभेत चर्चा करण्यात आली. काँग्रेस आणि इतर काही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी रस्ता सुरक्षेवर विशेष लक्ष देणे आणि अपघातांवर अंकुश लावण्यासाठी योग्य दिशेने ठोस पावलं उचलण्याची मागणीही लोकसभेत करण्यात आली.
गडकरींना म्हटलं 'स्पायडरमॅन'भाजप खासदार तापिर गाव (Tapir Gao) यांनी रस्ते निर्मितीसाठी सरकारचं कौतुक करत मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यांचं जाळं पसरवणारे 'स्पायडरमॅन' असा उल्लेख केला. "मी गडकरी यांचं नाव स्पायडरमॅन असं ठेवलं आहे. कारण त्यांनी देशभरात रस्त्यांचं जाळ तयार केलं आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर चीनच्या सीमेलगतही रस्त्यांचं काम तेजीनं सुरू आहे," असं चर्चेदरम्यान ते म्हणाले.
याशिवाय एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनीदेखील गडकरींच्या नेतृत्वाखाली देश या क्षेत्रात चांगली कामगिरी करत असल्याचं म्हणत कौतुक केलं. "राजकारण आणि टीका एका बाजूला, पण भाजपचा कोणी कट्टर विरोधकही असला तरी देशात सुरू असलेल्या रस्ते आणि महामार्गांच्या विकासाला पाहून गडकरींचं कौतुकत करेल," असं ते म्हणाले.