Kolkata Rain, Mamata Banerjee vs BJP: कोलकातामध्ये मंगळवारी जवळपास चार दशकांतील सर्वात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे किमान आठ जणांचा मृत्यू झाला. रात्रीच्या मुसळधार पावसामुळे शहरातील हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. शैक्षणिक संस्था बंद पडल्या आणि राज्य सरकारला सुटी जाहीर करावी लागली. भाजपा खासदार सुकांता मजुमदार यांनी कोलकातामध्ये वीज पडून झालेल्या मृत्यूंबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली. ममता बॅनर्जींनी फक्त सीईएससी आणि संजीव गोएंका यांना दोष देण्याऐवजी स्वत: या बाबींची नैतिक जबाबदारी स्वीकारावी, असे ते म्हणाले.
भाजप खासदार सुकांता मजुमदार म्हणाले, "मुख्यमंत्री सतत खाजगी कंपनीला दोष देत आहेत, पण याचा अर्थ असा नाही की त्या स्वत:वरची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलू शकतील. कोलकातामध्ये ही समस्या इतक्या वारंवार का उद्भवते? दोन वर्षांपूर्वी दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना झाली होती. मी स्वतः त्यांच्या घरी गेलो होतो. कोलकातामधील या सततच्या गोंधळाला कोण जबाबदार आहे?, संजीव गोयंका यांच्याशी कोण संपर्कात आहे? निवडणुकीदरम्यान त्यांच्याकडून कोण निधी घेतं? हे सारं आम्हाला माहिती आहे."
"कोलकाता हे एकमेव महानगर शहर आहे, जिथे लोंबकळणाऱ्या वीज तारा दिसतात. पावसाळ्यात पाणी साचणे नैसर्गिक आहे आणि ते इतर शहरांमध्येही होते. बंगळुरू आणि हैदराबादमध्येही अलीकडेच पूर आला होता, परंतु तेथील वीज तारांमुळे कोणीही मृत्युमुखी पडले नाही. जेव्हा हे प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारले जातात तेव्हा त्या उत्तर देऊ शकत नाहीत. त्या फक्त स्वतःचा बचाव करत राहतात. कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका. नेहमी इतरांना दोष देणे योग्य नाही," असे त्यांनी सुनावले.