VIDEO: पाहणी करताना आमदार पाण्यात घसरले, वाचवायला गेलेला गनमॅन वाहून गेला पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 14:06 IST2025-08-31T13:54:34+5:302025-08-31T14:06:02+5:30
उत्तराखंडमध्ये ढगफुटीनंतर पाहणी करायला गेलेल्या आमदाराच्या गनमॅनला वाहून जाताना एसडीआरएफने वाचवले

VIDEO: पाहणी करताना आमदार पाण्यात घसरले, वाचवायला गेलेला गनमॅन वाहून गेला पण...
Uttarakhand Flood:उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यात कापकोट परिसरातील ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. रात्री उशिरा झालेल्या ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. गावातील अनेक घरांमध्ये मातीचे ढिगारे घुसले, ज्यामुळे मोठे नुकसान झाले. तसेच ५० हून अधिक जनावरे वाहून गेली आणि सुमारे ५० टक्के शेतांचेही नुकसान झाले. दुसरीकडे, ढगफुटी झालेल्या भागाची पाहणी करायला गेलेल्या एका स्थानिक आमदाराचा सुरक्षा रक्षक वाहून गेला होता. मात्र बचाव पथकाने त्याला शर्थीचे प्रयत्न करुन वाचवलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कपकोटचे आमदार सुरेश गढिया हे आपत्तीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना घटनास्थळी पोहोचण्यात मोठ्या अडचणी आल्या. पौंसरी गाव आणि घटनास्थळादरम्यान वाहणाऱ्या ओढ्याचा प्रवाह खूप जास्त होता. एसडीआरएफच्या जवानांनी रशीच्या सहाय्याने आमदार सुरेश गढिया यांना ओढ्यातून दुसऱ्या बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. मात्र या वेळी पाण्याचा प्रवाह इतका वेगात होता की गढिया यांचा पाय अडखळला आणि त्यांचा तोल गेल्याने ते खाली पडू लागले. त्यामुळे त्यांचा गनमॅन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र याच प्रयत्नात गनमॅन जोरदार प्रवाहात वाहून गेला.
एसडीआरएफच्या जवानांनी तात्काळ कारवाई करत गनमॅनला सुरक्षितपणे वाचवले. या घटनेत आमदाराचा मोबाईल फोन आणि गनमॅनची कार्बाइन बंदूक जोरदार प्रवाहात वाहून गेली. गावकऱ्यांच्या मदतीने आणि जवानांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. गनमॅन बराच दूरपर्यंत वाहून गेला होता. जर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी लगेच हालचाल केली नसती तर त्याला जीव गमवावा लागला असता.
कपकोट से विधायक सुरेश चंद्र गड़िया अपने क्षेत्र में उफनती पहाड़ी नदी पार कर रहे थे, तभी उनका गनर तेज धारा में बह गया। विशेष आपदा प्रतिक्रिया बल के जवानों ने तुरंत कार्रवाई कर कुछ ही देर में उसे सुरक्षित बचा लिया। pic.twitter.com/ROItvoP9ut
— bhUpi Panwar (@askbhupi) August 29, 2025
या अपघातानंतर आमदार सुरेश गडिया यांनी एसडीआरएफ जवानांचे कौतुक केले. माझ्या गनमॅनला वाचवल्याबद्दल मी या जवानांचे आभार मानतो. त्यांच्या तात्काळ कारवाईमुळे एवढा मोठा अपघात टळला, असं गडिया म्हणाले.
दरम्यान, पौंसरी गावात ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावातील घरांमध्ये ढिगारा शिरल्याने दोन कुटुंबांना फटका बसला आहे. या अपघातात ६ जणांपैकी अनेक जण बेपत्ता झाले आहेत. पहिल्या कुटुंबातील रमेश चंद्र जोशी आणि त्यांचा मुलगा गिरीश अजूनही बेपत्ता आहेत. त्यांची पत्नी बसंती देवी यांचा मृतदेह सापडला आहे, तर दुसरा मुलगा पवन यांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. दुसऱ्या कुटुंबातील पुरण जोशी बेपत्ता आहे. त्यांची आई बाचुली देवी यांचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आला आहे. या घटनेत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गावातील रस्त्यासह अनेक रस्ते तुटले आहेत आणि खराब झाले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन देखील वाहून गेल्या आहेत.