Gujarat Assembly Election 2022 : गुजरात निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा; 20 लाख रोजगार देण्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 12:51 IST2022-11-26T12:45:02+5:302022-11-26T12:51:20+5:30
BJP Manifesto : भाजपने गुजरातसाठी आपला जाहीरनामा (Manifesto) जारी केला आहे.

Gujarat Assembly Election 2022 : गुजरात निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा; 20 लाख रोजगार देण्याचा दावा
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचार संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अशा स्थितीत सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजप (BJP) कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. यासाठी भाजपने देशातील आणि राज्य पातळीवरील सर्व दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी कामाला लावले आहे. दरम्यान, भाजपने गुजरातसाठी आपला जाहीरनामा (Manifesto) जारी केला आहे.
आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी भाजपने जाहीरनाम्यात अनेक मोठी आश्वासने दिली आहेत. यावेळी गुजरात दिशा देणारी भूमिका आहे. गुजरात ही संतांची भूमी आहे. नव्या संकल्पाने गुजरातचा विकास होईल. भाजप सरकार जे सांगते तेच करते. आम्ही संविधानानुसार चालतो, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले. भाजपच्या जाहीरनाम्यानुसार, गुजरातमधील तरुणांना पुढील 5 वर्षांत 20 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. 10,000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये 20,000 सरकारी शाळांचे रूपांतर उत्कृष्ट शाळांमध्ये केले जाईल.
#GujaratElections2022 | Gujarat CM Bhupendra Patel, BJP national president JP Nadda and state party president CR Paatil release BJP's manifesto for Gujarat Assembly polls. pic.twitter.com/e8xI0HuG4I
— ANI (@ANI) November 26, 2022
जाहीरनाम्यानुसार, 3 सिव्हिल मेडिसिटी, 2 एम्सच्या स्तरावरील संस्था स्थापन करण्यासाठी आणि सध्याची रुग्णालये, सीएचसी आणि पीएचलीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी 10,000 कोटी रुपये महाराजा श्री भागवत सिंह जी आरोग्य कोष तयार केले जाईल. तसेच, 2036 मध्ये ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्याच्या दृष्टीने, गुजरात ऑलिम्पिक मिशन सुरू होईल आणि जागतिक दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. गुजरातमधील प्रत्येक नागरिकाकडे पक्के घर असल्याची खात्री केली जाईल.
याचबरोबर, 1 लाखांहून अधिक महिलांना सरकारी नोकऱ्या देण्यात येणार आहेत. ज्येष्ठ महिला नागरिकांना मोफत बस प्रवासाची सुविधा मिळणार आहे. कामगारांना 2 लाख रुपयांपर्यंतचे असुरक्षित कर्ज देण्यासाठी कामगारांना क्रेडिट कार्ड दिले जातील. याशिवाय, गुजरात यूनिफॉर्म सिव्हिल कोड कमिटीच्या शिफारशी पूर्णतः लागू केला जाईल. अँटी-रॅडिकलायझेशन सेल तयार केला जाईल. गुजरात रिकव्हरी ऑफ डॅमेज ऑफ पब्लिक अँड प्रायव्हेट प्रॉपर्टी अॅक्ट लागू केला जाईल. साउथ ईस्टर्न पेरिफेरल हायवे आणि नॉर्थ वेस्टर्न पेरिफेरल हायवे बांधले जातील. यासह, संपूर्ण गुजरातला 4-6 लेन रस्त्यांनी जोडणारा 3,000 किमीचा पहिला परिक्रमा विकसित केला जाईल.
गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान
गुजरात विधानसभेच्या सर्व 182 जागांसाठी 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला, दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान होणार आहे. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. गेल्या 27 वर्षांपासून राज्यात भाजपची सत्ता असून, भाजप सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर, काँग्रेस आणि आपही भाजपची सत्ता उलथून टाकण्याच्या प्रयत्नात आहे.