महुआ मोइत्रांविरोधात भाजपकडून तक्रार, माँ कालीबाबत केलेल्या वक्तव्यासाठी केली अटकेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 13:49 IST2022-07-06T13:37:46+5:302022-07-06T13:49:35+5:30
Kaali Documentary : टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांना तात्काळ अटक करण्यासाठी भाजपनं तक्रार दाखल केली आहे.

महुआ मोइत्रांविरोधात भाजपकडून तक्रार, माँ कालीबाबत केलेल्या वक्तव्यासाठी केली अटकेची मागणी
'काली' या माहितीपटाचे (डॉक्युमेंट्री फिल्म) पोस्टर आणि टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांच्या वक्तव्यावरून वाद अजूनच वाढत आहे. भाजपने पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष टीएमसीवर माँ कालीचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. तसंच टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांना तात्काळ अटक करण्यासाठी भाजपनं तक्रार दाखल केली आहे.
वास्तविक, महुआ मोइत्रा मंगळवारी इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह ईस्ट 2022 मध्ये सहभागी झाली होत्या. यादरम्यान त्यांनी कालीच्या पोस्टरवरून सुरू असलेल्या वादावर म्हटलं होतं की, माँ कालीची अनेक रूपं आहेत. माझ्यासाठी काली म्हणजे मांस आणि वाइन स्वीकारणारी देवी. मात्र, टीएमसीने या विधानापासून दूर राहून त्याचा निषेध केला.
महुआ यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर बंगाल भाजपने विरोध दर्शवला आहे. भाजप नेते राजर्षी लाहिरी यांनी कोलकाता येथील रवींद्र सरोबार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महुआ मोईत्रा यांनी एका कार्यक्रमात माँ कालीबाबत काली ही देवी आहे जी मांस आणि मद्य स्वीकारते. मोइत्रा यांनी जाणूनबुजून आमच्या धर्म आणि धार्मिक श्रद्धेबाबत हे विधान केले आहे.
'काली' चित्रपटावर गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, मध्य प्रदेशात निर्मात्याविरोधात FIR होणार
कालीदेवीचा अपमान करण्याच्या उद्देशाने हे वक्तव्य करण्यात आल्याचे भाजप नेत्याने तक्रारीत म्हटले आहे. सध्या पश्चिम बंगाल राज्यात सर्वत्र जातीय हिंसाचार सुरू असून मालमत्तेची नासधूस केली जात आहे. पोलीस योग्य पद्धतीने काम करत नाहीत.
अशा परिस्थितीत महुआ मोईत्रा यांच्या वक्तव्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते, असे तक्रारीत म्हटले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या भावना दुखावण्याचा कोणालाही अधिकार नाही. महुआ मोईत्रा यांचे विधान धर्माच्या आधारावर विविध गटांमधील शत्रुत्वाला चालना देते. अशा प्रकरणात महुआविरुद्ध भादंवि कलम 153A आणि 295A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजप नेत्याने केली आहे.