भाजप नेते म्हणतायत, लोकसभेसाठी आमचे मिशन 48...; पत्रकाराच्या प्रश्नाला CM शिंदेंनी दिलं असं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 18:33 IST2022-08-07T18:32:03+5:302022-08-07T18:33:04+5:30
"अजित दादा मला स्वतः म्हणत होते की, तुम्ही दोघे छान काम करत आहात..."

भाजप नेते म्हणतायत, लोकसभेसाठी आमचे मिशन 48...; पत्रकाराच्या प्रश्नाला CM शिंदेंनी दिलं असं उत्तर
आगामी लोकसभा निवडनुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते कंबर कसून कामाला लागले आहेत. यातच, भाजप नेते तथा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी, आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपचे ‘मिशन 48’ असून, आमचे सर्वच्या सर्व 48 मतदार संघांवर लक्ष असणार आहे, असे म्हटले आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. ते दिलीत नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजपचे काही नेते म्हणत आहेत, की लोकसभेसाठी त्याचे मिशन 48 आहे? असा प्रश्न विचारला असता, शिंदे म्हणाले, "मिशन 48 बरोबर आहे ना. शिवसेना-भाजप युतीचे मिशन 48 आहेच. शिवसेना भाजप युतीचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. त्यामुळे शिवसेना भाडप युती मजबुतीने काम करेल, वाटचाल करेल आणि मला वाटते, की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही, आपल्याला यासंदर्भात सांगितले आहे."
"अजित दादा मला स्वतः म्हणत होते की, तुम्ही दोघे छान काम करत आहात" -
यावेळी, अजीत दादा म्हणत आहेत, की मुख्यमंत्री फक्त एकच शब्द बोलत आहेत की विस्तार लवकरच होईल. त्या पलिकेडे काही होत नाही, असे विचारण्यात आले असता मुख्यमंत्री म्हणाले, आता काय त्यांना तारीख..., माहीत पडेलना तुम्हाला. अजित दादा मला स्वतः म्हणत होते की, तुम्ही दोघे छान काम करत आहात, लवकर लवकर निर्णय घेत आहात. मी म्हणालो, की तुम्हीच सांगत आहात, की लवकर करा मंत्रिमंडळ. ते भेटले ना मला. अतिवृष्टीत पिकांचे जे काही नुकसान झाले, त्यासंदर्भात प्रश्न घेऊन आले होते. तसेच, ते विरोधी पक्ष नेते असले, तरी आमचे फार जिव्हाळ्याचे संबंध आहेत, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
फ्रेंडशीप डे सर्वांसाठीच असतो, माझ्या सर्वांनाच शुभेच्छा -
पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने, आपल्या गटातील आमदार म्हणत आहेत, की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची मैत्री पुन्हा पाहायला मिळावी, आम्हाला आनंद होईल, असे विचारले असता, फ्रेंडशीप डे सर्वांसाठीच असतो, माझ्या सर्वांनाच शुभेच्छा आहेत. असे शिंदे म्हणाले. यावेळी, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात भाजप-शिवसेना फॉर्म्युला ठरलायका, असे विचारले असता, तुम्हाला आता सांगितलं तर तुमची उत्सुकता संपून जाईल ना. तुम्ही आम्हाला मधे मधे विचारणारच नाही. त्यामुळे लवकर होऊन जाईल, अेस शिंदे यांनी म्हटले आहे.