UP BJP Leader Death: अयोध्येत रुग्णालयात वेळेत पोहोचू न शकल्याने भाजप नेत्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. भाजप नेत्याला रुग्णालयात नेत असताना अनेक बॅरिकेड्समुळे बराच उशीर झाला. त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने भाजप नेत्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भाजप नेत्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. दुसरीकडे अयोध्येच्या महापौरांनी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विविध ठिकाणी रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे म्हटलं आहे.
साकेत कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक आणि भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ.बी.डी.द्विवेदी यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. सकाळी छातीत दुखू लागल्याने आणि अस्वस्थतेच्या त्रासामुळे ते बी.डी.द्विवेदी, त्यांची पत्नी, मुलगा हे स्थानिक श्री राम रुग्णालयात निघाले होते. मात्र ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आल्याने रुग्णालयात वेळेवर पोहोचू न शकल्याने बीडी द्विवेदी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शरयूच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यदर्शनावेळी मोठ्या संख्येने भाजप नेते व लोक उपस्थित होते.
“आम्हाला बॅरिकेड्स पार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. माझ्या वडिलांचा मृत्यू झाला कारण आम्ही रुग्णालयात वेळेवर पोहोचू शकलो नाही. आम्हाला रुग्णालयात पोहोचण्यासाठी दोन तास लागले. आम्ही रुग्णवाहिकेची वाटही पाहू शकत नव्हतो कारण आमच्यापर्यंत पोहोचायला एक ते दोन तास लागत होते," असं बीडी द्विवेदी यांच्या मुलाने सांगितले.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडी द्विवेदी यांना शनिवारी सकाळी छातीत दुखण्याचा त्रास सुरु होता. त्यांची पत्नी आणि मुलाने त्यांना अयोध्येतील स्थानिक श्री राम रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला पण त्यांची गाडी देवकाली बॅरिअरवर थांबवण्यात आली. द्विवेदी कुटुंबाने निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांना बॅरिकेड हटवण्यास सांगितले. तसेच स्टेशन प्रभारी आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनाही फोन केला. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर सव्वा तासानंतर बॅरिकेड्स उघडण्यात आले. मात्र रस्त्यात अनेक बॅरिकेडमुळे त्यांची गाडी रुग्णालयापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळेत्यांनी राम पथमार्गे उदय चौराहा येथे जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांना पुन्हा थांबवण्यात आले.
यानंतर द्विवेदी कुटुंबिय फैजाबादच्या जिल्हा रुग्णालयाकडे गेले. मात्र तोपर्यंत दोन तास उलटून गेले होते आणि द्विवेदी यांचा वाटेतच मृत्यू झाला. द्विवेदी यांच्या मृत्यूवर अयोध्येच्या भाजपच्या नेत्यांनी अत्यंत वेदनादायक म्हटलं.