bjp Leader Anupam Hazra Test Corona Positive Who Threatened Mamata Banerjee With Covid Hug | 'कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन' म्हणणारे भाजपाचे नेते अनुपम हाजरा 'कोरोना पॉझिटिव्ह'! 

'कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन' म्हणणारे भाजपाचे नेते अनुपम हाजरा 'कोरोना पॉझिटिव्ह'! 

ठळक मुद्देभाजपाचे नेते अनुपम हाजरा यांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे भाजपाचे नेते अनुपम हाजरा यांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी अनुपम हाजरा यांची कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जर मला कोरोनाची लागण झाली, तर मी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन, जेणेकरुन त्यांना कोरोना रूग्णांच्या कुटुंबीयांच्या वेदना समजतील, असे वादग्रस्त विधान अनुपम हाजरा यांनी केले होते.

देशभरात कोरोनाचे संकट असताना गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाकडून राजकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी हजारोंच्या संख्येत उपस्थित असणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांनी मास्क लावले नव्हते किंवा सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत होते. याबाबत पत्रकारांनी अनुपम हाजरा यांना प्रश्न विचारला होता. त्यावर अनुपम हाजरा म्हणाले होते की, आमचे कार्यकर्ते कोविड-१९ पेक्षा खूप धोकादायक आव्हानाशी लढत आहेत, ते ममता बॅनर्जी यांच्याशी लढत आहेत. कारण त्या कोविड -१९ महामारीमुळे प्रभावित नाहीत आणि त्यांना कोणाची भीती नाही असे त्यांनी सांगितले होते. याशिवाय, जर मला कोरोना संसर्ग झाला तर मी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन, असे विधान अनुपम हाजरा यांनी केले होते.

अनुपम हाजरा तृणमूल काँग्रेसमध्ये होते
अनुपम हाजरा याआधी तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार होते. गेल्या वर्षी त्यांनी तृणमूल काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. भाजपाने आता राहुल सिन्हा यांच्या जागी अनुपम हाजरा यांची  राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. अनुपम हाजरा म्हटले होते की, राज्यात कोविड -१९ रुग्णांच्या पार्थिवावर ज्या प्रकारे अंत्यसंस्कार केले जात आहेत, ते दुःखद आहे. या महामारीच्या कोरोना पीडितांना अत्यंत चुकीची वागणूक दिली जात आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह रॉकेलने जाळले आहेत. आम्ही अशाप्रकारचे कृत्य कुत्रा किंवा मांजरीसोबतही करत नाही, असे अनुपम हाजरा यांनी म्हटले होते.

तृणमूल नेत्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला होता
ममता बॅजर्जी यांच्याबाबत केलेल्या या विधानावरुन तृणमूल काँग्रेसने अनुपम हाजरा यांच्यावर निशाणा साधत ते मानसिकदृष्ट्या अपरिपक्व असल्याचे म्हटले होते. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले की, हे विधान तो व्यक्ती करु शकतो जो वेडा आणि अपरिपक्व आहे. जो मानसिकदृष्ट्या बघत असेल तो अनुपम हाजरा यांचे विधान ऐकेल त्याला समजेल की तो कोणत्या प्रकारचा माणूस आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bjp Leader Anupam Hazra Test Corona Positive Who Threatened Mamata Banerjee With Covid Hug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.