दिल्लीत सरकार वि. प्रशासन; केजरीवालांच्या योजनांत खोडा; निवडणुकांपूर्वीच आपसमोर नवी अडचण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 06:32 IST2024-12-26T06:31:34+5:302024-12-26T06:32:36+5:30

राजधानीतील कडाक्याच्या थंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापले

BJP government has opposed the government schemes announced by the AAP through Delhi government departments | दिल्लीत सरकार वि. प्रशासन; केजरीवालांच्या योजनांत खोडा; निवडणुकांपूर्वीच आपसमोर नवी अडचण

दिल्लीत सरकार वि. प्रशासन; केजरीवालांच्या योजनांत खोडा; निवडणुकांपूर्वीच आपसमोर नवी अडचण

नवी दिल्ली:दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांआधीच आरोप- प्रत्यारोपांच्या फैरींमुळे राजधानीतील वातावरण तापले आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षाने निवडणुकांचा समोर ठेवत जाहीर केलेल्या मुख्यमंत्री महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजना या सरकारी योजनांना भाजप सरकारने दिल्ली सरकारी विभागांच्या माध्यमातून विरोध केला आहे. त्यावरून आपने भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. तर दुसरीकडे भाजप आणि आपला लक्ष्य करून काँग्रेसने श्वेतपत्रिका जाहीर केली आहे.

दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास विभाग आणि आरोग्य विभागाने बुधवारी एक नोटीस जारी करून आम आदमी पार्टी (आप) च्या महिलांना २,१०० रुपये आणि वृद्ध नागरिकांना मोफत उपचार देण्याच्या योजनांपासून स्वतःला लांब ठेवले आहे, ज्यामुळे विधानसभा निवडणुकांपूर्वी एक नवीन वाद निर्माण झाला आहे.

या 'अस्तित्वहीन' योजनांमध्ये नोंदणी करण्यासाठी कुणालाही माहिती शेअर करू नये, असे दोन्ही विभागांनी नागरिकांना आवाहन केले.

आप फसवणूक करते आहे; भाजपचा आरोप 

भारतीय जनता पक्षाने आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी अस्तित्वात नसलेल्या योजनांचा लाभ देण्याचे आश्वासन देऊन महिला आणि वृद्धांची राजकीय फसवणूक' केल्याचा आरोप केला आहे. 

भाजपच्या खासदार स्वराज यानी मंगळवारी दावा केला की, सांगितले की, 'संजीवनी योजना' नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही. दोन्ही योजनांच्या घोषणा केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकांना समोर ठेवून केल्या आहेत. त्यामुळे त्यासाठी कोणताही पुढाकार घेऊ नये.

आतिशी यांनाही अटक होण्याची शक्यता

मुख्यमंत्री महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजनेला भाजप घाबरले आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली. दिल्ल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीपासून आणि प्रचारातून 'आप'चे लक्ष विचलित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी भाजपने तपास यंत्रणांना मुख्यमंत्री आतिशी यांना बनावट प्रकरणात अटक करण्याचे आदेश दिल्याचे आम्हाला समजले आहे. आतिशी यांना अटक करण्यापूर्वी सर्व वरिष्ठ आप नेत्यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यात माझ्यासह मनीष सिसोदिया, संजय सिंह, सौरभ भारद्वाज, सत्येंद्र जैन आणि यांचा समावेश असेल, असा आरोपही केजरीवाल यांनी केला.

काँग्रेसची श्वेतपत्रिका 

दिल्लीच्या दुर्दशेला आम आदमी पार्टी सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत काँग्रेसने दोन्ही सरकारच्या 'काळ्या कृत्यां विरोधात श्वेतपत्रिका जारी केली.

दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीने 'मौका-मौका, हर बार धोका' नावाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. त्यामध्ये पक्षाने दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने पूर्तता न केलेल्या आश्वासनांची माहिती दिली. 

ही श्वेतपत्रिका प्रसिद्ध करताना अखिल भारतीय काँग्रेस समितीचे कोषाध्यक्ष अजय माकन म्हणाले की, 'दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार एकमेकांवर आरोप करत आहेत, त्यामुळे जनता त्रस्त आहे, जनता या दोघांमध्ये अडकली आहे. 

गेल्या अनेक वर्षांत या दोन्ही सरकारांनी दिल्लीला द्वेषाची राजधानी बनविले आहे.
 

Web Title: BJP government has opposed the government schemes announced by the AAP through Delhi government departments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.