राज्यघटनेवर भाजपा सतत हल्ले करतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:30 IST2018-05-18T00:30:21+5:302018-05-18T00:30:21+5:30
राज्यघटनेवर सातत्याने हल्ले सुरू असून, स्वायत्त व घटनात्मक संस्थांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे.

राज्यघटनेवर भाजपा सतत हल्ले करतोय
रायपूर/नवी दिल्ली : राज्यघटनेवर सातत्याने हल्ले सुरू असून, स्वायत्त व घटनात्मक संस्थांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे. हे प्रकार केवळ पाकिस्तान व हुकूमशाहीतच घडू शकतात, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. छत्तीसगढच्या जाहीर सभेत त्यांनी कर्नाटकात आमदारांच्या पळवापळवीचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्यावरही हल्ला चढवला.
कर्नाटकमध्ये एका बाजूला आमदार व दुसरीकडे राज्यपाल अशी परिस्थिती निर्माण असल्याचे ते म्हणाले. भाजपाकडून पोकळ विजयाचा आनंद साजरा केला जात असून प्रत्यक्षात देशभरात लोकशाहीचा पराभव झाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले जात आहे, असे टिष्ट्वटही त्यांनी केले. कर्नाटकातील घटनांच्या निषेधार्थ काँग्रेसने उद्या देशभर लोकशाही बचाव दिन पाळण्याचे ठरवले आहे. दिल्ली तसेच देशातील सर्व शहरांमध्ये काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते धरणे, मोर्चे व आंदोलन करून, हा दिवस पाळणार आहेत.
>काँग्रेसने संधीसाधूपणा करून जनता दलास पाठिंबा दिला, तेव्हाच खरे तर लोकशाहीची हत्या झाली. काँग्रेसने कर्नाटकच्या कल्याणासाठी नव्हे, तर राजकीय फायद्यासाठी जनता दलास पाठिंबा दिला. काँग्रेस अध्यक्षांना त्यांच्या पक्षाचा इतिहास माहीत नसावा. आणीबाणी, कलम ३५६ चा दुरुपयोग, न्यायालये तसेच प्रसारमाध्यमांना दुबळे करणे हा काँग्रेसचा इतिहास आहे.
- अमित शहा