पटना - तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन बिहार दौऱ्यावर आले असता भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींनी अशा नेत्यांना बिहारला बोलावले ज्यांनी बिहारींना शिव्या दिल्या. जर हिंमत असेल तर त्यांनी पुन्हा त्या गोष्टी बोलून दाखवाव्यात ज्या त्यांच्या पक्षाने बिहारींची खिल्ली उडवण्यासाठी केल्या होत्या असं चॅलेंजही डिएमके नेते स्टॅलिन आणि उदयनिधी यांना भाजपाने दिले आहे.
बुधवारी डिएमके नेते स्टॅलिन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मतदार अधिकार यात्रेत सहभागी होण्यासाठी बिहारच्या मुजफ्फरपूर येथे पोहचले होते. त्यावर तामिळनाडू भाजपा प्रवक्ते नारायण तिरुपती आणि माजी प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी त्यांना बिहारींबद्दल केलेल्या विधानाची आठवण करून दिली. तिरुपती म्हणाले की, स्टॅलिन त्या बिहारींसमोर मतदान मागायला चाललेत, ज्यांना ते शिवी देत होते. डिएमकेच्या लोकांनी बिहारींना अशिक्षित, पाणीपुरी विकणारे, तामिळनाडूत शौचालय साफ करणारे असं म्हणत होते. तुम्ही बिहारींचा अपमान केला आणि आता तिथे गेला आहात. तुमची हिंमत कशी झाली, आधी तुम्ही त्यांना शिव्या दिल्याबद्दल बिहारची माफी मागितली पाहिजे असं त्यांनी म्हटलं.
तसेच स्टॅलिन बिहारमध्ये त्यांचा मुलगा उदयनिधीकडून ते विधान पुन्हा म्हणू शकतात का, सनातन धर्म नष्ट करायला हवा, खासदार दयानिधी मारन हे पुन्हा बोलू शकतात का, ज्यात त्यांनी बिहारींना तामिळनाडूत शौचालय साफ करणारे म्हटले. जर तुमच्यात हिंमत असेल तर पुन्हा अशी विधाने करून दाखवा. जर तुम्ही राहुल गांधींच्या व्यासपीठावर गेला असाल तर पुन्हा स्वत:ची विधाने म्हणू शकता का असा सवाल करत के अन्नामलाई यांनी तिरुपती यांच्या विधानाचे समर्थन केले आहे.
बिहारींच्या DNA वर प्रश्नचिन्ह
जेडीयूनेही स्टॅलिन यांच्या बिहार दौऱ्यावर प्रश्न उभे केले आहेत. राहुल गांधी यांनी हिंदूंविरोधात अश्लील भाष्य करणारे स्टॅलिन साहेब यांना बिहारला बोलावले आहे. त्यांनी बिहारींच्या डीएनएवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे रेवंत रेड्डी यांनाही बोलावले आहे. तेजस्वी यादव अशा लोकांसोबत असताना बिहारच्या लोकांकडून त्यांना पाठिंबा देण्याची अपेक्षा कशी करू शकतात? असं जेडीयू नेते अभिषेक झा म्हणाले
काय केले होते विधान?
उदयनिधी आणि मारन यांनी २०२३ मध्ये वादग्रस्त विधाने केली होती. २०२३ मध्ये खासदार दयानिधी मारन आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी बिहारींसाठी आक्षेपार्ह भाष्य केले होते. दयानिधी मारन यांना एका व्हिडिओमध्ये असे म्हणताना दाखवण्यात आले होते की बिहारमधील हिंदी भाषिक लोक तामिळनाडूमध्ये घरे बांधतात आणि शौचालये स्वच्छ करतात. यापूर्वी उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म मिटवण्याच्या वक्तव्यावरून देशाच्या राजकारणात बरीच चर्चा झाली होती. उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांशी केली होती. टीका होऊनही त्यांनी माफी मागण्यास नकार दिला होता.