BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 17:05 IST2025-12-16T17:04:22+5:302025-12-16T17:05:31+5:30
भाजपा कधी काळी सामान्य संसाधने असलेल्या अनेक राष्ट्रीय पक्षांपैकी एक होता. मात्र, साधारणपणे केवळ ११ वर्षांत भारतातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष बनला आहे...

BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
भारतीय जनता पक्षाचा 2014 नंतरचा आर्थिक प्रवास आणि त्यात झालेला बदल, हा भारतीय राजकीय फंडिंगमधील सर्वात मोठ्या बदलांपैकी एक म्हणावा लागेल. भाजपा कधी काळी सामान्य संसाधने असलेल्या अनेक राष्ट्रीय पक्षांपैकी एक होता. मात्र, साधारणपणे केवळ ११ वर्षांत भारतातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष बनला आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR) जारी केलेला डेटा आणि अधिकृत आय खुलाशांनुसार, २०१४ मध्ये केंद्रात सत्तेवर आल्यानंतर भाजपाच्या उत्पन्नात आणि संपत्तीत किती वेगाने वाढ झाली, हे दिसून येते.
अशी होती २०१४ ची स्थिती -
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपची आर्थिक ताकद फारशी मजबूत नव्हती. मात्र, आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये पक्षाने सुमारे ६७४ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न घोषित केले होते आणि त्यांची एकूण संपत्ती सुमारे ₹७८१ कोटी एवढी होती. त्यावेळी भाजप आणि काँग्रेससारख्या इतर पक्षांमधील आर्थिक स्थितीतील फरक फार मोठा नव्हता. मात्र, २०१४ मध्ये केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत गेली. आर्थिक वर्ष २०२२-२३ पर्यंत पक्षाचे घोषित उत्पन्न सुमारे ₹२,३६० कोटी एवढे झाले, जे २०१४ पूर्वीच्या उत्पन्नाच्या तुलनेत अडीचशे टक्क्यांहून अधिक होते.
निवडणुका असलेल्या वर्षांमध्ये ही वाढ अधिक दिसून आली. २०१९-२० या आर्थिक वर्षात पक्षाने ₹३,६२३ कोटी ही विक्रमी कमाई जाहीर केली होती, आणि ताज्या माहितीनुसार, २०२३-२४ मध्ये हे उत्पन्न ₹४,३४० कोटींपर्यंत पोहोचले आहे.
एका दशकात ९ पटीने वाढलेली संपत्ती -
पक्षाच्या उत्पन्नात वाढ झाल्याने एकूण संपत्तीतही जबरदस्त वाढ झाली आहे. २०१३-१४ मध्ये सुमारे ₹७८१ कोटी असलेली भाजपाची एकूण संपत्ती २०२२-२३ पर्यंत ₹७,०५२ कोटींहून अधिक झाली आहे. ही जवळजवळ ९ पटीची वाढ दर्शवते. पक्षाने सातत्याने आपल्या कमीईच्या तुलनेत कमी खर्च केला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शिल्लक (Surplus) जमा होत गेली. अर्थात आता भारतीय जनता पक्ष आर्थिक दृष्या अत्यंत बलशाली झाला आहे.