भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 13:15 IST2025-05-16T13:12:54+5:302025-05-16T13:15:52+5:30
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान तुर्कस्तानने पाकची बाजू घेत आपलं मत मांडलं होतं. मात्र, यानंतर भरतात 'बॉयकॉट तुर्की'चा ट्रेंड सुरू झाला आहे. याचा फटका आता तुर्कीला बसू शकतो.

भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान, तुर्की पाकिस्तानच्या समर्थनार्थ सर्वात आधी पुढे आला होता. तेव्हापासून, भारतात तुर्कस्तानवर बंदी घालण्याचा ट्रेंड इंटरनेटवर जोर धरत आहे. पण, आता यामुळे तुर्कस्तानला मोठा फटका बसू शकतो. कारण, पाकिस्तानला पाठिंबा देणारे तुर्की लोक भारतातील भात आणि मसाले खातात. दोन्ही देशांमधील व्यापार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. तांदूळ आणि मसाल्यांचा हा व्यापार तब्बल १० अब्ज डॉलर्सपेक्षा मोठा आहे. पण, आता पाकिस्तानला पाठिंबा देणे तुर्कीला महागात पडू शकते.
२०२३-२४ मध्ये भारताने तुर्कीला ६.६५ अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात केली होती. भारतातून तुर्कीमध्ये बऱ्याच गोष्टी निर्यात केल्या जातात. या यादीत तांदूळ, मसाले, कापड, चहा आणि कॉफी यांचा समावेश आहे. बासमती तांदळासाठी तुर्की पूर्णपणे भारतावर अवलंबून आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात बासमती तांदूळ तुर्कीमध्ये जातो. तुर्कीतील लोकांना भारतीय बासमती तांदळापासून बनवलेली बिर्याणी खायला आवडते. इतकंच नाही तर, बिर्याणी बनवण्यासाठी वापरले जाणारे मसाले देखील भारतातूनच तुर्कीला जातात. भारत हा बासमती तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार आहे आणि तुर्की देखील त्याचा मोठा खरेदीदार आहे.
मसाले आणि चहाचीही मोठी निर्यात
भारत तुर्कीला हळद, जिरे, धणे आणि लाल मिरची देखील पाठवतो. भारतीय मसाले त्यांच्या ताजेपणा आणि सुगंधासाठी जगभरात लोकप्रिय आहेत. भारतातून तुर्कस्तानात कापूस, रेशीम आणि तयार कपडे देखील निर्यात केले जातात. तिथे भारतीय साड्या, कुर्ता, बेडशीट, पडदे खूप लोकप्रिय आहेत. जर, तुर्कीसोबतचे संबंध बिघडले तर त्याचा कापड, तांदूळ आणि मसाल्यांच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. दार्जिलिंगचा चहा आणि कॉफी भारतातून तुर्कीला पाठवला जातो.