Birthday special Story about Veer Bhagat Singh and their messages to nation | जयंती विशेष: मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत फासावर गेले भगत सिंग; कुणी दिलं होतं त्यांना हे नाव?

जयंती विशेष: मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत फासावर गेले भगत सिंग; कुणी दिलं होतं त्यांना हे नाव?

ठळक मुद्देभगत सिंगांनी आपल्या अदम्य साहसाने संपूर्ण इंग्रजी सत्ता हदरवून सोडली होती.जलियावाला बाग घटनेचा भगत सिंगांवर मोठा परिणाम झाला होता. केला होता ‘सँडर्स-वध’, दिल्लीच्या सेंट्रल असेम्ब्लीमध्ये फेकले होते बॉम्ब

क्रांतिकारक वीर भगत सिंग यांचा आज जन्मदिवस. 28 सप्टेंबर 1907 रोजी भगत सिंगांचा जन्म झाला आणि 23 मार्च 1931 रोजी भारतमातेचा हा पुत्र मात्रृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत फासावर गेला. भगत सिंगांनी आपल्या अदम्य साहसाने संपूर्ण इंग्रजी सत्ता हदरवून सोडली होती. ते कारागृहात असूनही शेवटच्या क्षणापर्यंत स्वतंत्रच होते.

आजोबा-आजींनी ठेवलं होतं 'भगत सिंग' नाव - 
वीर भगत सिंगांच्या वडिलांचे नाव सरदार किशन सिंग आणि आईचे नाव विद्यावती, असे होते. आजोबा अर्जुन सिंग आणि आजी जयकौर यांनी त्यांना भाग्याचा म्हणून त्यांचे नाव 'भगत सिंग' असे ठेवले. भगत सिंगांचे वडील स्वतंत्रता सेनानी सरदार किशन सिंग हे लाहोर येथे कारागृहात होते. भगत सिंगांच्या जन्मानंतर त्यांची सुटका झाली. एवढेच नाही, तर भगत सिंगाच्या जन्माच्या तिसऱ्या दिवशी त्याच्या दोन्ही काकांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. म्हणून, भगत सिंगांना आजी-आजोबांनी भाग्याचा मुलगा मानले होते. 

जलियावाला बाग घटनेचा झाला परिणाम -
13 एप्रिल 1919, बैसाखीचा दिवस, याच दिवशी रोलेट अ‍ॅक्टविरोधात जलियांवाला बाग येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा, जनरल डायरच्या क्रूर आदेशानंतर निशस्त्र लोकांनर इंग्रज सैनिकांनी गोळीबार केला. यामुळे देशातील क्रांतीच्या आगीचा वनवा अधिकच भडकला. अगदी 12 वर्षांच्या भगतसिंगांवरही या सामूहिक हत्याकांटाचा मोठा परिणाम झाला होता. याच जलियांवाला बागेच्या रक्त रंजित भूमीची शपथ घेऊन त्यांनी इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्याचा शंखनाद केला होता. यानंतर लाहोर नॅशनल कॉलेजमधील शिक्षण सोडून त्यांनी 'नौजवान भारत सभे'ची स्थापनाही केली होती. 

कुटुंबियांनी टाकला लग्नासाठी दबाव, भगत सिंगानी घरच सोडलं -
एक वेळ अशीही आली होती, की भगत सिंगांवर त्यांच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी दबाव टाकला होता. यानंतर घरच्यांच्या दबावामुळे त्यांनी घर सोडले. घर सोडून जातांना ते म्हणाले होते, ''माझे जिवन मोठ्या उद्देशासाठी म्हणजे 'आजादी-ए-हिन्द'साठी समर्पित केले आहे. यामुळे माझ्या आयुष्यात आराम आणि जगातील इच्छांना कुठलेही स्थान नाही.'' यानंतर, लग्नासाठी दबाव न टाकण्याचे आश्वासन मिळाल्यानंतरच ते घरी परतले. 

‘सँडर्स-वध’, दिल्लीच्या सेंट्रल असेम्ब्लीमध्ये फेकले बॉम्ब -
इंग्रजांविरोधात पंजाब केसरी लाला लाजपत राय हे शांततेने आंदोलन करत होते. तेव्हा पोलीस अधीक्षक स्कॉट आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आंदोलन करत्यांवर लाठीचार्ज केला. यात लाला लाजपत राय गंभीर जखमी झाले. यानंतर 17 नोव्हेंबरला त्यांना हौतात्म्य आले. लालाजींच्या मृत्यूनंतर भगत सिंगांनी  ‘सँडर्स’चा वध केला आणि नंतर दिल्लीच्या सेंट्रल असेम्ब्लीमध्ये चंद्रशेखर आझाद आणि पक्षाच्या काही इतर सदस्यांच्या सहकार्याने बॉम्ब-स्फोट करून इंग्रजी सत्ता मुळासकट हदरवली.

(भगत सिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी अ‍सेम्ब्लीमध्ये फेकलेला बॉम्ब. या बॉम्बचा स्फोट झाला नाही व दोघांविरोधात पुरावा प्राप्त झाला.)

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'अभिनव भारत'ची मदत -
सरदार भगत सिंगांनी या सर्व कार्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'अभिनव भारत' या क्रांतिकारक संघटनेचीही मदत घेतली होती. एढेच नाही, तर याच संघटनेकडून बॉम्ब तयार करण्याची कलाही त्यांनी शिकून घेतली होती. यापूर्वी एकदा, भगत सिंगांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचीही भेट घेतली होती. भगत सिंगांनी सावरकर लिखित ‘1857 चे स्वातंत्र्य समर’ वाचल्यानंतर, लगेचच रत्नागिरी गाठले होते. येथे सावरकर नजर कैदेत होते. ही गोष्ट आहे 1928ची. यावेळी भगत सिंगांनी सावरकरांच्या या पुस्तकाची पंजाबी भाषेतील आवृत्ती छापण्याची परवाणगी सावरकरांना मागितली होती. याचा हेतू तरुण क्रांतिकारकांत उत्साह निर्माण करणे होता. एवढेच नाही, तर 'एचआरएसए'साठी थोडे पैसे जमा करता यावेत, यासाठी भगत सिंगांनी या पुस्ताकाची किंमतही थोडी अधिक ठेवली होती.

भगत सिंगांना अटक -
सेंट्रल अ‍सेम्ब्लीमध्ये बॉम्ब फेकल्यानंतर, भगत सिंग आणि बटुकेश्वर दत्त यांना अटक झाली. या दोघांवरही सेंट्रल अ‍सेम्ब्लीमध्ये बॉम्ब फेकल्यावरून खटला चालला. सुखदेव आणि राजगुरू यांनाही अटक करण्यात आली. 7 ऑक्टोबर 1930ला भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर बटुकेश्वर दत्त यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 

जेलमधील अखेरचे क्षण - 
भगत सिंग यांना पुस्तके वाचण्याचा नाद होता. त्यांनी अखेरच्या क्षणी 'रिव्हॉल्युशनरी लेनिन' नावाचे पुस्क मागवले होते. त्यांचे वकील प्राणनाथ मेहता यांनी त्यांना पुस्तक दिले. यानंतर मेहता यांनी भगत सिंगांना विचारले, देशासाठी काही संदेश देण्याची इच्छा आहे. यावर भगत सिंग म्हणाले, ''केवळ दोनच संदेश साम्राज्यवाद मुर्दाबाद आणि 'इंकलाब झिंदाबाद.'' 

काही वेळानंतर भगत सिंगांसह राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीसाठी कारागृहाच्या कोठडीतून बाहेर आणण्यात आले. यानंतर भारत मातेला प्रणाम करत आणि स्वातंत्र्याचे गाणे गात हे वीर हसत-हसत फासावर गेले.

सावरकरांयी 'ती' कविता -
भगत सिंगांना फाशी झाल्यानंतर, स्वातंत्र्यवीर सावरकरांची एक कवीताही समोर आली. ही कविता, वीर भगत सिंगांच्या फाशीच्या दिवशी रत्नागिरीमध्ये तरुणांनी एक फेरी काढून गायली होती. त्या कवितेच्या सुरुवातीच्या ओळी अशा -
‘’हा भगतसिंग, हाय हा
जाशि आजि, फाशी आम्हांस्तवचि वीरा, हाय हा! 
राजगुरू तूं, हाय हा!   
राष्ट्र समरी, वीर कुमरा पडसि झुंजत, हाय हा!  
हाय हा, जयजय अहा!  
हाय हायचि आजची, उदयीकच्या जिंकी जया’’

हेही वाचा - 

Shaheed Diwas : भगत सिंग यांच्यासंबंधित 11 दुर्मिळ फोटो

भगत सिंग यांची ती ऐतिहासिक बंदूक 90 वर्षांनंतर जगासमोर

 

English summary :
Birthday special Story about Veer Bhagat Singh and their messages to nation.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Birthday special Story about Veer Bhagat Singh and their messages to nation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.