‘सुलभ इंटरनॅशनल’चे बिंदेश्वर पाठक यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 07:57 AM2023-08-16T07:57:33+5:302023-08-16T07:58:35+5:30

बिंदेश्वर पाठक यांच्या पश्चात पत्नी, दोन कन्या आणि एक पुत्र असा परिवार आहे. 

bindeshwar pathak of sulabh international passed away | ‘सुलभ इंटरनॅशनल’चे बिंदेश्वर पाठक यांचे निधन

‘सुलभ इंटरनॅशनल’चे बिंदेश्वर पाठक यांचे निधन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सुलभ शौचालय या संकल्पनेचे निर्माते अर्थात सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचे मंगळवारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. बिंदेश्वर पाठक यांच्या पश्चात पत्नी, दोन कन्या आणि एक पुत्र असा परिवार आहे. 

स्वातंत्र्यदिनी बिंदेश्वर यांनी सकाळी ध्वजारोहण केले, त्यानंतर ते कोसळून पडल्याने त्यांना लगेच एम्समध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती त्यांच्या मदतनीसाने दिली. एम्स रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले की, दुपारी १.४२ वा.  त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले होते, मात्र उपचारांपूर्वीच त्यांचे निधन झाले होते. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतातील सुलभ शौचालय या संकल्पनेचे ते जनक होते.  मानवी हक्क, पर्यावरणात्मक शौचालय सुविधा, कचरा व्यवस्थापन आणि शिक्षणाच्या माध्यमातून सुधारणा घडविण्याचे काम सुलभ इंटरनॅशनल या संस्थेने केले आहे. 

बिंदेश्वर पाठक यांनी सुलभ शौचालयाची संकल्पना मांडली व प्रथम ती बिहार राज्यातील पाटण्यातील गांधी मैदानाजवळ १९७२ मध्ये अंमलात आणली. त्या संकल्पनेवर आधारित शौचालयांची साखळी नंतर देशभरात तयार केली गेली. अनेक हजार सुलभ शौचालये त्यामुळे तयार झाली. शहरांमधून, ग्रामीण व निमग्रामीण, निमशहरी भागातही ही संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याने लोकांचा शौचालयांचा प्रश्न बऱ्याच अंशी सोडवण्याचा प्रयत्न झाला.  युएनओने त्यांना सदस्यही बनवले होते.

क्रांतिकारी काम 

सार्वजनिक शौचालये बांधण्याचे आणि स्वच्छतेसाठी सतत काम करण्याचे क्रांतिकारी काम बिंदेश्वर पाठक यांनी केले होते. ते सदैव लक्षात राहील. पद्मभूषणसह विविध पुरस्कारही त्यांना मिळाले होते. त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताने धक्का बसला. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत. - द्रौपदी मुर्मु, राष्ट्रपती.

देशाचे मोठे नुकसान

पाठक यांच्या निधनामुळे देशाचे मोठे नुकसान झाले असून सामाजिक विकास आणि तळागाळातील समाजामधील लोकांना हक्क, अधिकार मिळवून देण्याच्या कामी त्यांनी कार्य केले आहे. स्वच्छ भारताच्या उभारणीसाठी त्यांचे कार्य आठवणीत राहील, स्वच्छतेसाठी त्यांचे असणारे योगदान मोठे असून अनेक लोकांना त्यांच्या कामामुळे प्रेरणा मिळाली आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान.


 

Web Title: bindeshwar pathak of sulabh international passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :delhiदिल्ली