देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:05 IST2025-11-05T17:04:06+5:302025-11-05T17:05:08+5:30
वेगाने येणाऱ्या मेमू लोकल ट्रेनने थांबलेल्या मालगाडीला धडक दिली, ज्यामध्ये ११ प्रवाशांचा मृत्यू झाला आणि सुमारे २० जण गंभीर जखमी झाले

देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
छत्तीसगडमधील बिलासपूर स्टेशनजवळ ४ नोव्हेंबर रोजी ट्रेनचा एक भीषण अपघात झाला. वेगाने येणाऱ्या मेमू लोकल ट्रेनने थांबलेल्या मालगाडीला धडक दिली, ज्यामध्ये ११ प्रवाशांचा मृत्यू झाला आणि सुमारे २० जण गंभीर जखमी झाले. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले गेले. मात्र या भयानक दृश्यात एका चिमुकल्याचा जीव वाचला.
अपघातात जखमी झालेल्या या मुलाचे पालक अद्याप सापडलेले नाहीत. रेल्वे प्रशासन आणि स्थानिक रहिवाशांनी बचावकार्य सुरू केलं. तेव्हा लहान मुलगा ढिगाऱ्याजवळ जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला ताबडतोब रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे याचे पालक सापडले नाहीत.
रेल्वे प्रशासनाने मुलाच्या पालकांबद्दल किंवा नातेवाईकांबद्दल माहिती असल्यास रेल्वे रुग्णालय किंवा बिलासपूर रेल्वे नियंत्रण कक्षाशी त्वरित संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. रेल्वेने सांगितलं की, घटनेनंतर लगेचच मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं. एनडीआरएफ, रेल्वे पोलीस, स्थानिक पोलीस आणि वैद्यकीय पथकांनी संयुक्तपणे हे केलं.
सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रेल्वे प्रशासनाने प्राथमिक मदत म्हणून सर्व जखमींना ५०,००० रुपयांची मदत केली आहे. वरिष्ठ अधिकारी नियमितपणे रुग्णालयांची तपासणी करत आहेत आणि जखमींना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत. या अपघातात अनेक कुटुंबांनी आपले नातेवाईक गमावले असल्याचं चित्र पाहायला मिळत असताना दुसरीकडे हा चिमुकला अपघातातून वाचला आहे.
प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की, वेगाने आलेली मेमू लोकल ट्रेन सिग्नल ओलांडून एका थांबलेल्या मालगाडीला मागच्या बाजूने धडकली, ज्यामुळे ओव्हरहेड वायर आणि सिग्नलिंग सिस्टमचं मोठं नुकसान झालं आणि अनेक डबे रुळावरून घसरले. बिलासपूर-कटनी विभागात हा भीषण अपघात झाला, ज्यामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा तात्काळ थांबवण्यात आली होती.