गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील गाझियाबादमध्ये एक घटना घडली होती. येथे घरकाम करणारी एक मोलकरीण मूत्र टाकून अन्न शिजवायची. या घृणास्पद घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. हा प्रकार सर्वांच्याच स्मरणात असेल. आता, उत्तर प्रदेशातील बिजनौरमधून असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे एक मोलकरीण ग्लासमध्ये लघवी करून, ती स्वच्छ केलेल्या भांड्यांवर शिंपडत असल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
बिजनोर जिल्ह्यातील नगीना येथील एका व्यापाऱ्याच्या घरी गेल्या १० वर्षांपासून एक वृद्ध महिला काम करते. या कुटुंबाला गेल्या काही दिवसांपासून तिचे वागणे विचित्र वाटत होते. यामुळे घरातील एका महिलेने मोलकरणीवर लक्ष ठेवण्यासाठी स्वयंपाकघरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. यानंतर, बुधवारी दुपारी मोलकरीण स्वयंपाकघरात काम करत होती. ती भांडी धूत होती, दरम्यान तिने एका ग्लासमध्ये लघवी केली आणि नंतर ती धुतलेल्या भांड्यांवर शिंपडली.
काम करून मोलकरीण निघून गेल्यानंतर, कुटुंबातील सदस्यांनी सीसीटीव्ही तपासला आणि त्यांना धक्का बसला. या मोलकणीचे संपूर्ण कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. संध्याकाळी, जेव्हा मोलकरीण काम करण्यासाठी घरी पोहोचली तेव्हा तिला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याच बरोबर संबंधित सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना देण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची चौकशी केली असता, तिने चूक मान्य केली. मात्र, आणखी काहीही सांगण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात कोणतीही लेखी तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मात्र, शांतता भंग केल्याबद्दल महिलेचे चलान करण्यात आले आहे.