बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 17:41 IST2025-07-27T17:40:52+5:302025-07-27T17:41:26+5:30
Bijapur Naxals Encounter: मागील १९ महिन्यांत ४२५ नक्षलवाद्यांना कंठस्नान!

बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
Bijapur Naxals Encounter: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद/मावोवादाला मुळापासून नष्ट करण्याची शपथ घेतली आहे. या पार्श्वभूमीवर नक्षलप्रभावित राज्यांमध्ये तीव्र कारवाया सुरू आहेत. अशाच एका कारवाईत छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. चकमकीत १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या दोन महिलांसह चार नक्षलवादी ठार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बिजापूर जिल्ह्याच्या नैऋत्य भागातील बासगुडा आणि गंगलुर पोलिस ठाण्याच्या सीमावर्ती जंगलात माओवादी लपल्याची माहिती मिळाली होती. या आधारे, सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. काल (शनिवार) संध्याकाळपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. ही चकमक रविवारी दुपारी संपली. या चकमकीत दक्षिण उपक्षेत्रीय ब्युरोचे चार माओवादी ठार झाले.
Chhattisgarh | Bodies of 4 maoists recovered in the ongoing encounter between security forces and maoists in Bijapur. A huge quantity of weapons, including INSAS and SLR rifles recovered from the spot: IG Bastar, P Sundarraj
— ANI (@ANI) July 26, 2025
मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त
चकमकीच्या ठिकाणाहून एक एसएलआर, एक इन्सास, एक ३०३ रायफल, एक १२ बोर बंदूक, बीजीएल लाँचर, सिंगल शॉट शस्त्र, मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि नक्षल संबंधित इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. विजापूरचे पोलिस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी ही माहिती दिली.
ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावे
- हुंगा, एसीएम, प्लाटून क्रमांक १०, दक्षिण उपक्षेत्रीय ब्युरो - ५ लाख रुपयांचे बक्षीस.
- लखे, एसीएम, प्लाटून क्रमांक ३०, दक्षिण उपक्षेत्रीय ब्युरो -५ लाख रुपयांचे बक्षीस.
- भीम, एसीएम, साउथ सब झोनल ब्युरो - ५ लाख रुपयांचे बक्षीस.
- निहाल उर्फ राहुल, सदस्य - सरकारने २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
१९ महिन्यांत ४२५ नक्षलवादी ठार
बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. म्हणाले की, २०२४ मध्ये मिळालेल्या निर्णायक आघाडीला पुढे नेत, २०२५ मध्येही बस्तर विभागात बंदी घातलेल्या आणि बेकायदेशीर सीपीआय (माओवादी) संघटनेविरुद्ध सुरक्षा दलांकडून तीव्र कारवाई केली जात आहे. या कारवाईअंतर्गत, जानेवारी २०२४ ते जुलै २०२५ पर्यंत ४२५ कट्टर माओवाद्यांना ठार करण्यात आले आहे.