छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 14:32 IST2025-09-12T14:30:02+5:302025-09-12T14:32:11+5:30
Bijapur Naxal Encounter: गेल्या चोवीस तासात १२ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले आहे.

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
Bijapur Naxal Encounter: छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात शुक्रवारी (१२ सप्टेंबर) झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी आणखी दोन नक्षलवाद्यांना ठार केले. यासोबतच, गेल्या २४ तासांत सुरक्षा दलांना मिळालेले हे दुसरे मोठे यश आहे. यापूर्वी, गुरुवारी गरियाबंद जिल्ह्यात १० नक्षलवादी मारले गेले होते.
बिजापूर जिल्ह्यातील नैऋत्य भागात माओवाद्यांच्या हालचालीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. या कारवाईदरम्यान, सकाळी सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. चकमकीच्या ठिकाणाहून आतापर्यंत २ माओवाद्यांचे मृतदेह जप्त करण्यात आले आहेत. तसेच, घटनास्थळावरून ३०३ रायफल आणि इतर शस्त्रे, स्फोटके आणि दैनंदिन वापराच्या वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. ऑपरेशन अजूनही सुरू आहे असून, ते पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती समोर येईल.
आतापर्यंत २४३ नक्षलवादी मारले गेले
गरियाबंद चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) चा वरिष्ठ नेता आणि केंद्रीय समिती सदस्य (सीसीएम) मोडेम बालकृष्ण उर्फ भास्कर याचाही समावेश आहे. भास्करवर १ कोटी रुपयांचे बक्षीस होते. रायपूर प्रदेशाचे पोलिस महानिरीक्षक अमरेश मिश्रा यांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी मैनपूर भागात झालेल्या चकमकीत किमान १० नक्षलवाद्यांना ठार मारले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या वर्षी आतापर्यंत छत्तीसगडमध्ये वेगवेगळ्या चकमकीत २४३ नक्षलवादी मारले गेले आहेत. जानेवारीमध्ये गरिबंदच्या मैनपूर भागात झालेल्या चकमकीत १६ नक्षलवादी मारले गेले होते. तर, गेल्या वर्षी सुरक्षा दलांनी छत्तीसगडमध्ये वेगवेगळ्या चकमकीत २१९ नक्षलवाद्यांना ठार मारले. सरकारने मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद्यांना संपवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्याच अनुषंगाने ही कारवाई केली जात आहे.
Bijapur, Chhattisgarh: Police arrested 26 Naxals and recovered a large quantity of explosives, including IEDs, cooker bombs, tiffin bombs, Cardex wires, safety wires, and digging tools
— IANS (@ians_india) September 11, 2025
(Video Source: Police) pic.twitter.com/uGYRKkcSbU
अमित शाह काय म्हणाले?
गरियाबंदच्या यशानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, "आज आपल्या सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठे यश मिळवले आहे. छत्तीसगडमध्ये सीआरपीएफच्या कोब्रा कमांडो, छत्तीसगड पोलिस आणि डीआरजी यांनी संयुक्त कारवाईत १० कुख्यात नक्षलवाद्यांना ठार मारले. उर्वरित नक्षलवाद्यांनीही वेळेत आत्मसमर्पण करावे, अन्यथा त्यांनाही असेच मारले जाईल."