बि‘हार’बॉम्बने भाजपात कानठळ्या!
By Admin | Updated: November 10, 2015 02:59 IST2015-11-10T02:59:01+5:302015-11-10T02:59:01+5:30
बिहारमध्ये पानिपत होताच संघ परिवारात विसंवादी पडघम वाजू लागले आहेत. चिंता आणि चिंतनाच्या पातळीवर राजधानी दिल्लीतील राजकारण सोमवारी कमालीचे ढवळून निघाले.

बि‘हार’बॉम्बने भाजपात कानठळ्या!
नवी दिल्ली : बिहारमध्ये पानिपत होताच संघ परिवारात विसंवादी पडघम वाजू लागले आहेत. चिंता आणि चिंतनाच्या पातळीवर राजधानी दिल्लीतील राजकारण सोमवारी कमालीचे ढवळून निघाले.
सोशल मीडियात या निकालावरील मल्लिनाथीचे स्वच्छ प्रतिबिंब उमटले, शिवाय पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंतच्या माध्यमांनीही नरेंद्र मोदींचा प्रभाव ओसरल्याची ठळक दखल घेतली. भाजपा तसेच संघातील एकाधिकारशाहीच्या विरोधातील आवाज मोठा झाल्याचा महत्वाचा बदल दिवसभराच्या घडामोडींनी अधोरेखित केला.
भाजपातून आणि रालोआतून पहिल्यांदाच सरसंघचालक मोहन भागवतांविरुद्ध तोफ डागली गेली. पण भाजपा संसदीय मंडळाच्या संध्याकाळी झालेल्या बैठकीत ही आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी तर सकाळीच सरसंघचालकांची भेट घेऊन त्यांच्या बचावाच्या रणनीतीचे संकेत दिले. या वेगवान घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी सरसंघचालकांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या.
भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक हा दिवसभरातील घडामोडींच्या केंद्रस्थानी राहिली. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आरक्षणासंबंधी विधानावर जोरदार टीका होऊन खापर त्यांच्या माथी फोडण्याचे चिन्ह दिसत असताना, या बैठकीत त्यांचा भक्कम बचाव करण्यात आला. विशेषत: भाजपाच्या मित्र पक्षांनी जितनराम मांझी (हम), रामविलास पासवान (लोजपा) अनुप्रिया पटेल (अपना दल) किंवा भाजपचेच हुकूमदेव नारायण यादव यांनी भागवत यांच्या विधानावर जाहीरपणे टीका केली होती. खासदार अश्विनीकुमार आणि शांताकुमार यांनीसुद्धा पराभवासाठी मोदी व पक्षाध्यक्ष शहा यांच्यासह भागवत यांनाही जबाबदार धरले आहे.
बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली भागवत यांच्या भक्कम बचावाला समोर आले. कोणत्याही एखाद्या नेत्याच्या एखाद्या विधानामुळे बिहार निवडणुकीच्या निष्पत्तीवर परिणाम झालेला नाही, असे सांगत त्यांनी भागवत यांना दोष देण्याचे टाळले. त्याखेरीज पक्षश्रेष्ठींना थेट आव्हान देणारे शॉटगन खा. शत्रुघ्न सिन्हा, आर.के. सिंग यांच्यावर कारवाईची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात होती, प्रत्यक्षात चर्चाही झाली नाही. एकूणच ही प्रदीर्घ बैठक केवळ सारवासारव करणारी ठरली.
भाजपामधील असंतुष्टांनी डोके वर काढल्यामुळे त्यांना लगाम घालत शांत बसविण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींनी चालविल्याचे दिसते. शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोअर समितीच्या सर्व १२ सदस्यांनी हजेरी लावली.
बिहार निवडणूक निकालाच्या रणधुमाळीतून बाहेर पडत केंद्र सरकारने विरोधी पक्षांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनात महत्त्वाची दुरुस्ती विधेयके मंजूर करून घेण्यास सहकार्य करण्याचे आवाहन सोमवारी केले. तसेच बिहारमध्ये मिळालेला विजय म्हणजे संसदेत गदारोळ घालण्याचा जनादेश असल्याचे मानू नका, असेही सुचविले. संसदेचे हिवाळी अधिवेशन २६ नोव्हेंबरला सुरू होणार असून २३ डिसेंबरपर्यत चालेल.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत भारतीय राज्यघटना स्वीकारण्याचा स्मृतीदिन आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ हिवाळी अधिवेशनाचे पहिले दोन दिवस विशेष सत्र बोलावण्याचे ठरले आहे.
————
भाजपाच्या या दारुण पराभवाचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले. बिहारसंबंधीचे हॅश टॅग टिष्ट्वटरवर टॉप ट्रेन्डमध्ये होते. ‘दिवाळीचा हंगाम असल्याने जवळच्या भाजपाच्या कार्यालयात फटाके सवलतीच्या दरात मिळत आहेत,’ अशी खोचक प्रतिक्रिया देत नेटिझन्सनी भाजपाला चिमटा काढला, तर दुसरीकडे भाजपाच्या पाठीराख्यांनी मात्र बिहारमध्ये पुन्हा ‘जंगलराज’ आल्याचे म्हटले. व्यंगचित्रकारांनीही या परिस्थितीवर चित्रांमधून भाष्य केले आहे.
विरोधक आक्रमक होणार
हिवाळी अधिवेशनात सरकार वस्तू आणि सेवाकर विधेयक (जीएसटी), स्थावर मालमत्ता आणि भूसंपादन विधेयकासह अनेक महत्त्वाची विधेयके पारित करून घेण्याचा प्रयत्न करेल. पण बिहारमधील विजयाने उत्साहात असलेले विरोधी पक्ष सरकारविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतील, अशी चिन्हे आहेत.
केंद्राचा विस्तारही तूर्तास नाही...
२६ नोव्हेंबर रोजी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. संसद अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ किंवा भाजपात संघटनात्मक बदल होण्याची शक्यता नसल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले. नितिशकुमारांचा शपथविधी छटपुजेनंतर
भरघोस यश मिळवून सत्ता स्थापन करणाऱ्या महाआघाडीचा शपथविधी छटपुजेनंतर होणार आहे. नव्या मंत्रिमंडळात नितिशकुमारांसह ३६ मंत्र्यांचा समावेश असेल. राजदचे १६, जदयूचे १५ तर काँग्रेसचे ५ मंत्री यावेळी शपथ घेतील.
जबाबदार नेत्यांना धडा शिकवा
भाजपाचे असंतुष्ट खासदार आणि चित्रपट अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सोमवारी पाटण्यात मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची भेट घेऊन भरघोस यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर निवडणुकीत पक्षाच्या पराभवाला जबाबदार नेत्यांना धडा शिकविण्यात यावा,अशी मागणी त्यांनी भाजपाच्या श्रेष्ठींकडे केली.
माझ्यामुळे पराभव नाही-भागवत
आरक्षणासंदर्भात मी केलेल्या वक्तव्याने पराभव झाला असे म्हणणे चुकीचे आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी आरक्षणाच्या फेरमांडणीबद्दल बोललो होतो आणि भाजपा नेते त्याची व्यवहार्यता पटवून देण्यात अपयशी ठरले. - मोहन भागवत