बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 12:51 IST2025-08-27T12:49:56+5:302025-08-27T12:51:14+5:30
श्रवण कुमार यांच्या ताफ्यावर काही लोकांनी जीवघेणा हल्ला केला. ज्यामध्ये बॉडीगार्ड जखमी झाला आहे.

फोटो - आजतक
बिहारच्या नालंदा जिल्ह्यात नितीश सरकारचे मंत्री आणि जेडीयू नेते श्रवण कुमार यांच्या ताफ्यावर काही लोकांनी जीवघेणा हल्ला केला. ज्यामध्ये बॉडीगार्ड जखमी झाला आहे. हिलसा पोलीस स्टेशन परिसरातील मलावां गावात ही घटना घडली. मंत्री अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ९ जणांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आले होते.
याच दरम्यान, मंत्र्यांच्या ताफ्यावर काही लोकांनी हल्ला केला. या लोकांनी सुमारे एक किलोमीटरपर्यंत ताफ्याचा पाठलाग केला. सध्या गावात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २ दिवसांपूर्वी एक अपघात झाला होता, ज्यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला होता.
स्थानिक आमदार प्रेम मुखिया आणि मंत्री श्रवण कुमार पीडित कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी मलावां गावात पोहोचले होते. अर्ध्या तासानंतर, जेव्हा सर्वजण बाहेर येत होते. याच वेळी अचानक काही लोकांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
घटनेनंतर मंत्री आणि आमदार कसेबसे घटनास्थळावरून पळून गेले. काही सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. माहिती मिळताच अनेक पोलीस ठाण्यांचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास करत आहेत.