हत्या आणि जेलही थांबू शकले नाही; मोकामात बाहुबली अनंत सिंह २१ हजारांच्या मताधिक्याने आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 14:21 IST2025-11-14T13:44:51+5:302025-11-14T14:21:56+5:30
मोकामामध्ये अनंत सिंग यांचे वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित होताना दिसत आहे.

हत्या आणि जेलही थांबू शकले नाही; मोकामात बाहुबली अनंत सिंह २१ हजारांच्या मताधिक्याने आघाडीवर
Bihar Mokama Result: बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत राजधानी पटनाजवळील हाय-प्रोफाइल मोकामा विधानसभा मतदारसंघाने अपेक्षेप्रमाणेच संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. खून, तुरुंगवास आणि त्रिकोणीय लढत अशा नाट्यमय घडामोडींनंतरही बाहुबली नेते आणि जदयूचे उमेदवार अनंत सिंह यांनी मोठी आघाडी घेतली असून, त्यांनी आपली मोकामातील राजकीय पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत पटनाजवळची हाय-प्रोफाइल मोकामा विधानसभा जागा अपेक्षेप्रमाणेच चर्चेत आहे. सध्याच्या मतमोजणीच्या कलानुसार, अनंत सिंह यांनी ७३,१११ मते मिळवली आहेत. अनंत सिंह हे त्यांच्या प्रतिस्पर्धी राजदच्या वीणा देवी (५१,४२९ मते) यांच्यापेक्षा तब्बल २१,६२८ मतांनी आघाडीवर आहेत. जन सुराजचे उमेदवार प्रियदर्शी पीयूष ११,२३१ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
मोकामाची जागा यावेळी सर्वाधिक चर्चेत होती कारण अनंत सिंह यांना एका गुन्हेगारी प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर त्यांची आमदारकी गेली होती. त्यानंतर पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नीने विजय मिळवला होता. मात्र, या निवडणुकीत अनंत सिंह यांच्या अडचणीत भर पडली. मतदानापूर्वीच मोकामातील मोठे नेते दुलारचंद यादव यांची हत्या झाली, आणि या हत्येचा थेट आरोप अनंत सिंह यांच्यावर झाला. या प्रकरणात त्यांची अटकही झाली आणि सध्या ते तुरुंगात आहेत.
राजदने या सीटवर दुसरे बाहुबली नेते सूरजभान सिंह यांच्या पत्नी वीणा देवी यांना तिकीट देऊन जोरदार आव्हान उभे केले होते. दुलारचंद यादव हे जन सुराजचे उमेदवार प्रियदर्शी पीयूष यांचे समर्थक असल्याने, त्यांच्या हत्येमुळे लढत त्रिकोणीय झाली आणि जन सुराजनेही या ठिकाणी चांगली मते मिळवली. तुरुंगात असतानाही आणि हत्येचे आरोप असतानाही अनंत सिंह यांच्यासाठी जदयूचे मोठे नेते आणि केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह ऊर्फ लल्लन सिंह यांनी प्रचार केला.
२० वर्षांपासून अनंत सिंहांचा बालेकिल्ला
मोकामा हा मतदारसंघ गेल्या २० वर्षांपासून अनंत सिंह आणि त्यांच्या कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. २००५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा जदयूच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर २०१०,२०१५ आणि २०२० मध्ये त्यांनी सातत्याने विजय मिळवला.२०२० मध्ये त्यांनी आरजेडीच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळवला होता. पण नंतर शस्त्रास्त्र कायद्यातील एका प्रकरणात दोषी ठरल्याने त्यांची आमदारकी रद्द झाली.
दरम्यान, यावेळी या मतदारसंघात विक्रमी मतदान झाले होते. या मतदानामुळे कोणाला फायदा होणार याबद्दल सस्पेन्स होता. पण ताज्या कलांनुसार मोकामाच्या जनतेने पुन्हा एकदा 'छोटे सरकार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनंत सिंह यांच्यावर विश्वास दाखवल्याचे दिसत आहे.