Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 18:13 IST2025-11-12T17:31:53+5:302025-11-12T18:13:21+5:30
Bihar Exit Poll : बिहारमधील मतदान संपले आहे. या निवडणुकीचे निकाल १४ नोव्हेंबर रोजी समोर येणार आहेत. दरम्यान, काल एक्झिट पोलचे आकडे समोर आले. यामध्ये अनेक पोलनी एनडीएचे सरकार येणार असल्याचा अंदाज दिला आहे.

Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
Bihar Exit Poll: बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर देशाचे लक्ष एक्झिट पोलच्या अंदाजाकडे लागले होते. एक्झिट पोलचे अदाज काल समोर आले. एक्झिट पोलमध्ये भाजप-जनता दल युनायटेड-लोक जनशक्ती पार्टी यांच्या एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालेले दिसत असून राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस यांची महाआघाडी व प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला अनपेक्षित असा मोठ्या पराभवाचा फटका बसल्याचे चित्र आहे.
सर्व प्रमुख सर्वेक्षण संस्थांनी बिहारमध्ये महाआघाडीचा मोठा पराभव आणि एनडीएचा मोठा विजय होण्याची शक्यता वर्तवली आहे. पण, एक्झिट पोल अनेकदा चुकीचे ठरले आहेत, त्यामुळे १४ नोव्हेंबरपर्यंत अचूक निकालांची वाट पहावी लागेल. मागील बिहार विधानसभा निवडणुकांसाठीचे एक्झिट पोल यापूर्वी अपयशी ठरले आहेत. २०१५ आणि २०२० च्या विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलने ज्या पक्षांना विजयाचा अंदाज दिला होता ते पक्ष हरले होते.
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
२०२० च्या एक्झिट पोलमध्ये महाआघाडीच्या विजयाचा अंदाज
पाच वर्षांपूर्वी, २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल चुकीचे ठरले. बहुतेक सर्वेक्षण संस्थांनी राज्यात महाआघाडीच्या विजयाचे भाकित केले होते, त्यामुळे राजद समर्थकांनी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन करणारे पोस्टर्सही लावले होते. निकाल आल्यावर एनडीएने सरकार स्थापन केले. एबीपी न्यूज-सी व्होटरने महाआघाडीला १०८-१३१ जागा दिल्या, तर एनडीएला १०४-१२८ जागा मिळाल्या. आज तक-अॅक्सिस माय इंडियाने एनडीएला ६९-९१ जागा दिल्या, तर महाआघाडीला १३९-१६१ जागा मिळाल्या. रिपब्लिक भारत जन की बातने महाआघाडीला ११८-१३८ जागा दिल्या, तर एनडीएला ९१-११७ जागा मिळाल्या. शिवाय, टुडेज चाणक्य देखील पूर्णपणे अपयशी ठरला. बिहारमधील त्यांच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला ५५ आणि महाआघाडीला १८० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ज्यावेळी निकाल जाहीर झाले तेव्हा हे एक्झिट पोल चुकीचे ठरले आणि महाआघाडीचा पराभव झाला. एनडीएने सरकार स्थापन केले आणि नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
२०१५ च्या एक्झिट पोलचे अंदाज काय होते?
२०१५ च्या विधानसभा निवडणुकीत, आरजेडी, काँग्रेस आणि जेडीयू यांनी महाआघाडी म्हणून एकत्र निवडणुका लढवल्या, यामध्ये भाजप एनडीएमध्ये आघाडीचा पक्ष होता. ज्यावेळी एक्झिट पोल जाहीर झाले तेव्हा दोन प्रमुख एक्झिट पोलमध्ये एनडीएला विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, तर प्रत्यक्षात महाआघाडी जिंकली. टुडेज चाणक्यने एनडीएला १५५ जागा दिल्या होत्या, तर महाआघाडीला फक्त ८५ जागा. आज तक सिसेरोने एनडीएला ११३-१२७ जागा आणि महाआघाडीला १११-१२३ जागा दिल्या होत्या. अशाप्रकारे, दोन्ही सर्वेक्षण संस्थांनी राज्यात एनडीए सरकार येण्याचा अंदाज वर्तवला होता. काही सर्वेक्षण संस्थांनी महाआघाडीसाठी जवळची स्पर्धा होण्याचीही शक्यता वर्तवली होती. सी व्होटरने एनडीएला १०१-१२१ आणि महाआघाडीला ११२-१३२ जागा दिल्या, तर एबीपीने एनडीएला १०८ आणि महाआघाडीला १३० जागा दिल्या. पण जेव्हा निकाल आले तेव्हा महाआघाडीने १७८ जागा जिंकून विजय मिळवला, तर एनडीएला फक्त ५८ जागांवर समाधान मानावे लागले.