लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 17:58 IST2025-08-06T17:53:02+5:302025-08-06T17:58:07+5:30
Bihar Elections 2025, Disha Patani : बिहार निवडणुकीसाठी सर्वच पक्ष विविध प्रकारे मोर्चेबांधणी करत आहेत. तशातच लालू प्रसाद यादवांचे धाकटे सुपुत्र तेज प्रताप यादव यांनी एक अजब खेळी केली आहे.

लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
Bihar Elections 2025: बिहारचे माजी मंत्री आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांनी ५ लहान पक्षांसोबत युती करून सर्वांना आश्चर्यचकित केले. युतीची घोषणा करताना तेज प्रताप म्हणाले की, आमची युती सामाजिक न्याय, सामाजिक हक्क आणि संपूर्ण परिवर्तनाच्या भावनेने काम करेल. हे सर्व पक्ष असे आहेत की लोक त्यांना इंटरनेटवर पटकन शोधूही शकत नाहीयेत. या ५ पक्षांमध्ये एक पक्ष असा आहे, ज्याचे सोशल मीडियावर केवळ फक्त ३ फॉलोअर्स आहेत. इतकेच नव्हे तर हा पक्ष अभिनेत्री दिशा पटानी (Dish Patani) हिला फॉलो करतोय.
कोणत्या ५ पक्षांशी युती?
तेज प्रताप यादव यांच्यासोबत, विकास वंचित इन्सान पार्टी (VVIP), भोजपुरी जन मोर्चा (BJM), प्रगतीशील जनता पार्टी (PJP), वाजिब अधिकार पार्टी (WAP) आणि संयुक्त किसान विकास पार्टी (SKVP) यांनी एखत्र येऊन युती करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी वाजिब अधिकार पार्टीला लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्याचा अनुभव आहे. तर प्रगतीशील जनता पार्टी आणि संयुक्त किसान विकास पार्टीला प्रत्येकी एक निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे. संयुक्त किसान विकास पार्टीचे प्रमुख सुधीर कुमार यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत नालंदा मतदारसंघातून आपले नशीब आजमावले. सुधीर यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले.
PJP अध्यक्षांनी लढवली २०२०ची निवडणूक, दिशा पटानीला पक्ष करतो फॉलो
प्रगतीशील जनता पक्षाबद्दल बोलायचे झाल्यास, हा पक्ष राजकारणाच्या दृष्टीने १० वर्षे जुना पक्ष आहे. हा पक्ष गरीब आणि बेरोजगार तरुणांच्या हिताबद्दल आपल्या भूमिका रोखठोकपणे मांडताना दिसतो. पक्षाचे प्रमुख मनोरंजन कुमार श्रीवास्तव यांनी २०२०च्या निवडणुकीत उशी या निवडणूक चिन्हावर आपले नशीब आजमावले होते. परंतु त्यांना फक्त २८२ मते मिळाली. प्रगतीशील जनता पक्षाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाउंट आहेत, पण ते तेथे फारसे सक्रिय नाही आणि त्यांचे जास्त फॉलोअर्स नाहीत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर, त्यांचे @pjp4india हँडल फक्त ३ लोक फॉलो करतात, तर त्यांचा पक्ष स्वतः केवळ ५ लोकांना फॉलो करतो. या ५ अकाऊंटमध्ये अभिनेत्री आणि मॉडेल दिशा पटानीचाही समावेश आहे.
दिशा व्यतिरिक्त, ५ लोकांपैकी एक जण दिमित्री म्हणून आहे, जो मोबाईल गेम बनवतो. तर उर्वरित ३ लोकांचे फॉलोअर्स तर खूपच कमी आहेत. एकट्या दिशा पटानीचे ८२ लाख फॉलोअर्स आहेत. त्याचप्रमाणे, या पार्टीचे इंस्टाग्रामवर ४१ फॉलोअर्स आहेत तर ते १५ लोकांना फॉलो करते. या हँडलवरून २८ पोस्ट करण्यात आल्या आहेत.