कोट्यधीश उमेदवारांमध्ये गरीब जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी चढाओढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 09:49 IST2025-10-26T09:48:55+5:302025-10-26T09:49:14+5:30
श्रीमंत उमेदवार आता गरीब जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी इच्छुक

कोट्यधीश उमेदवारांमध्ये गरीब जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी चढाओढ
एस. पी. सिन्हा
पाटणा: यंदाच्या बिहार विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरलेल्या एकूण उमेदवारांपैकी सुमारे ७३ टक्के उमेदवार करोडपती आहेत. हे सारे श्रीमंत उमेदवार आता गरीब जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी इच्छुक आहेत.
दाखल झालेल्या प्रतिज्ञापत्रांनुसार एनडीए, महाआघाडीच्या उमेदवारांपैकी सुमारे ७३ टक्के उमेदवार करोडपती आहेत. १० कोटींपेक्षा जास्त मालमत्ता असलेल्या उमेदवारांचा विचार करता महाआघाडीकडे असे सर्वाधिक २८, तर एनडीएकडे २२ उमेदवार आहेत. राजदच्या उमेदवारांची संख्या अधिक आहे.
१० कोटीपेक्षा जास्त संपत्ती नेमकी कुणाकडे आहे?
राजदच्या १४१ उमेदवारांपैकी १५ टक्के उमेदवारांकडे १० कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. एनडीएमध्ये भाजपकडे १० कोटींहून अधिक संपत्ती असलेले सर्वाधिक म्हणजे नऊ, तर जदयूकडे सात उमेदवार आहेत. भाजप उमेदवारांत सिद्धार्थ सौरभ हे सर्वात श्रीमंत उमेदवार पाटणा जिल्ह्यातील बिक्रम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांची मालमत्ता ४२.८७ कोटी रुपये आहे.
१० कोटींपेक्षा जास्त संपत्ती असलेले उमेदवार कुणाचे?
महाआघाडी १८
एनडीए २२
फक्त ३७ हजार रुपयांची मालमत्ता कुणाकडे आहे?
भाजपचेच मुंगेरचे उमेदवार कुमार प्रणय यांची मालमत्ता १७.७८ कोटी आहे. दरम्यान, जेडीयूमध्ये बारबिघा येथील डॉ. कुमार पुष्पांजय ७१.५७ कोर्टीव्या संपत्तीसह पक्षातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर बेलांगज येथून निवडणूक लढवणाऱ्या मनोरमा देवी आहेत. त्यांची मालमत्ता ४५.८७ कोटी आहे. सीपीआय-एमएल उमेदवार वृंदावन आरसी यांची मालमत्ता फक्त ३७,००० रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्र दर्शवते. १० कोटींपेक्षा अधिक संपत्ती असलेला काँग्रेस पक्षाचा एकही उमेदवार नाही.
सर्वाधिक श्रीमंत उमेदवार नेमके कोणत्या पक्षांत?
एलजेपीच्या २९ उमेदवारांपैकी चार उमेदवारांकडे १० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएमओकडे १० कोटींपेक्षा जास्त संपत्ती असलेला कोणताही उमेदवार नाही.
राजदमध्ये हाजीपूरचे देव कुमार चौरसिया (६७ कोटी), नरपतगंजचे दीपक यादव (४२ कोटी) आणि बरहरियाचे अरुण गुप्ता (४०.९ कोटी) या उमेदवारांचा समावेश आहे.
काँग्रेसचे सुपौलचे उमेदवार मिन्नतुल्ला रहमान ३७.१९ कोटींपेक्षा जास्त संपत्तीसह यादीत अव्वल आहेत.