'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 08:57 IST2025-11-09T08:57:24+5:302025-11-09T08:57:42+5:30
पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये १४ सभा घेत शनिवारी आपला प्रचार संपवला.

'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
PM Modi Bihar Election: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिमी चंपारणमधील चनपटिया येथे विशाल रॅली घेऊन बिहार विधानसभा निवडणुकीचा आपला प्रचार समाप्त केला आहे. चनपटियामध्ये पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. बिहार सोडताना मोदींनी एक महत्त्वपूर्ण विधान केले. १४ नोव्हेंबरच्या विजयानंतर ते एनडीएच्या शपथग्रहण समारोहात सहभागी होण्यासाठी पुन्हा एकदा बिहारमध्ये परत येतील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. विशेष म्हणजे, त्यांनी यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नाव घेतले नाही.
पंतप्रधानांनी आपल्या अंतिम सभेत महिला सक्षमीकरण अधिक लक्ष केंद्रित केले. ते म्हणाले की, "डबल इंजिन"चे सरकार महिलांच्या अधिकारांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यांनी मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा उल्लेख करत १.४० कोटी जीविका दीदींना प्रत्येकी १० हजार रुपये देण्यात आल्याची माहिती दिली. यासोबतच, पंचायती राज संस्थांमध्ये महिलांना ३५ टक्के आरक्षण आणि संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय एनडीएनेच घेतला असल्याचे त्यांनी ठळकपणे सांगितले.
जंगलराजला मतदानातून झटका देण्याचे आवाहन
जनतेशी संवाद साधताना पंतप्रधानांनी लोकांना आपले मोबाईलचे लाईट चालू करण्यास सांगितले. हा बिहार बदलत असल्याचा आणि विकसित होत असल्याचा संकेत असल्याचे त्यांनी सांगितले. बिहारच्या लोकांना आता कोणत्याही परिस्थितीत जंगलराज पुन्हा नको आहे, असे ते म्हणाले.
'मधुबनी पेंटिंग'चे ब्रँड अॅम्बेसेडर मोदी
पंतप्रधानांनी बिहारच्या मुलींचा गौरव करत म्हटले की, मधुबनी पेंटिंग आणि येथील कला पुढे नेण्यासाठी मी स्वतः ब्रँड अॅम्बेसेडर बनलो आहे. त्यांनी अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपतींना आणि दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना बिहारमधील कलाकारांनी बनवलेली मधुबनी पेंटिंग भेट दिल्याचा आवर्जून उल्लेख केला.
राहुल गांधींवर अप्रत्यक्ष निशाणा साधताना, "येथे काही लोक असे आहेत जे आपल्या छठी मैयाचाही अपमान करतात. जे लोक संस्कृती आणि परंपरांचा अपमान करतात, त्यांना मतांच्या माध्यमातून जागेवर पोहोचवण्याची गरज आहे. बिहारच्या लोकांनी पहिल्याच टप्प्यात विरोधकांना ६५ व्होल्टचा झटका दिला असून, ६५.०८ टक्के मतदान करून एनडीएच्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत, असे म्हटले.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात १२२ जागांवर मतदान होणार आहे, ज्यासाठी आज प्रचार संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ च्या बिहार निवडणुकीत २०२० च्या तुलनेत अधिक वेळ दिला आहे. २०२० मध्ये पंतप्रधान चार वेळा बिहारमध्ये आले आणि त्यांनी १२ सभा घेतल्या होत्या. २०२५ मध्ये पंतप्रधान सात वेळा बिहारमध्ये आले आणि त्यांनी १४ निवडणूक जाहीर सभांना संबोधित केले आहे.
पंतप्रधानांनी २४ ऑक्टोबरला जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या गावी त्यांना श्रद्धांजली वाहून आपल्या प्रचाराची सुरुवात केली होती. अंतिम दिवशी त्यांनी सीतामढी आणि बेतिया येथे सभा घेतल्या. या दरम्यान, बेगूसराय, मुजफ्फरपूर, छपरा, सहरसा, कटिहार, आरा, नवादा, भागलपूर, अररिया, औरंगाबाद आणि भभुआ यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणीही त्यांच्या सभा झाल्या. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.