बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 17:56 IST2025-11-14T17:56:09+5:302025-11-14T17:56:57+5:30
बिहारमध्ये भाजप, जेडीयू आणि एलजेपी-आर या पक्षांची आघाडी २०० हून अधिक जागांवर विजय मिळवताना दिसत आहे. याउलट, राष्ट्रीय जनता दल आघाडी ३० पेक्षा कमी जागांवर पिछाडीवर आहे.

बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे आलेले कल पाहता एनडीए राज्यात मोठे बहुमत मिळवून सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप, जेडीयू आणि एलजेपी-आर या पक्षांची आघाडी २०० हून अधिक जागांवर विजय मिळवताना दिसत आहे. याउलट, राष्ट्रीय जनता दल आघाडी ३० पेक्षा कमी जागांवर पिछाडीवर आहे.
दरम्यान, मोठ्या फरकाने पिछाडीवर असूनही राजदलाअद्यापही निवडणुकीची 'बाजी पलटण्याची' आशा कायम आहे. आरजेडीचे ज्येष्ठ नेते मनोज झा यांनी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषदेत बोलताना ही शक्यता व्यक्त केली.
मनोज झा यांचा 'सायकॉलॉजिकल गेम'चा दावा
मनोज झा यांनी असा युक्तिवाद केला की, बहुतांश जागांवर मतांचा फरक खूपच कमी आहे. त्यांनी या सर्व प्रक्रियेला 'मानसिक खेळ' असे संबोधले. त्यांनी आपल्या उमेदवारांना मतमोजणी केंद्रांवर शेवटपर्यंत टिकून राहण्याचे आवाहन केले आहे.
मनोज झा म्हणाले, "मतमोजणी सुरू आहे. आम्ही आमच्या सर्व उमेदवारांना सांगू इच्छितो की हा एक मानसिक खेळ देखील सुरू आहे. सरासरी ५ ते ७ फेऱ्यांची मतमोजणी झाली आहे. आम्ही आकडेमोड केली आहे, ६५ ते ७० जागा अशा आहेत, जिथे ३ ते ५ हजार किंवा त्याहूनही कमी मतांचे अंतर आहे. अजून ३० फेऱ्यांची मतमोजणी होणे बाकी आहे. तुम्ही लक्ष ठेवून राहा आणि विजयाचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय बाहेर पडू नका."
परिस्थिती बदलण्याची शक्यता?
मतमोजणीची गती खूपच धीमी आहे, अनेक ठिकाणी केवळ ७ फेऱ्यांची मोजणी झाली असल्याचे मनोज झा यांनी सांगितले. भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष खूप घाईचा असल्याचे सांगत त्यांनी पूर्वीही अशा परिस्थितीत बदल झालेले पाहिले आहेत, असे नमूद केले.
ते म्हणाले, "मी ६०-७० जागांची नावे देऊ शकतो, जिथे खूप कमी अंतर आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जेव्हा आमच्या भागातील ईव्हीएम उघडतील, तेव्हा परिस्थिती बदलू शकते आणि याची पूर्ण शक्यता आहे."