"माझं ६ नंबरचं मत भाजपाच्या २ नंबरला...", पराभवानंतर पुष्पम प्रिया यांचा EVM वर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 14:14 IST2025-11-17T14:12:04+5:302025-11-17T14:14:34+5:30
Pushpam Priya Choudhary : पुष्पम प्रिया चौधरी यांनी दरभंगा विधानसभा मतदारसंघात ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचा गंभीर आरोप केला.

"माझं ६ नंबरचं मत भाजपाच्या २ नंबरला...", पराभवानंतर पुष्पम प्रिया यांचा EVM वर गंभीर आरोप
२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्लुरल्स पार्टीच्या अध्यक्षा पुष्पम प्रिया चौधरी यांनी दरभंगा विधानसभा मतदारसंघात ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचा गंभीर आरोप केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर एका पोस्टमध्ये त्यांनी दावा केला की ईव्हीएम बटण क्रमांक "वरून" बदलण्यात आले जेणेकरून त्यांचं मत थेट भाजपा उमेदवाराला ट्रान्सफर करता येईल.
पुष्पम प्रिया यांनी आपल्या पोस्टमध्ये संपूर्ण प्रक्रियेचं वर्णन करताना लिहिलं की, "दरभंगा येथे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर, आम्हाला स्थानिक पातळीवर सांगण्यात आलं की ईव्हीएममध्ये उमेश सहनीसाठी बटण क्रमांक ६, मला (पुष्पम प्रिया) बटण क्रमांक ७ आणि जनसुराजच्या आरके मिश्रा यांचं बटण क्रमांक ८ असेल. परंतु २४ तासांच्या आत, ते "वरून" ५, ६ आणि ७ मध्ये बदलण्यात आलं."
दरभंगा में नामांकन के बाद स्थानीय स्तर पर हमें बताया गया कि EVM में महागठबंधन के उमेश सहनी का क्रमांक 6, मेरा अर्थात् पुष्पम प्रिया का 7 और जनसुराज के आर के मिश्रा का 8 नंबर बटन होगा। पर 24 घंटे के अंदर उसे “ऊपर से” बदलकर 5,6,7 कर दिया गया। मशीन में शायद तय किया जा चुका था कि 6…
— Pushpam Priya Choudhary (@pushpampc13) November 16, 2025
ही फेरफार जाणीवपूर्वक केलेल्या कटाचा भाग होती, ज्यामध्ये तांत्रिक चूक होती. पुष्पम प्रिया यांनी असा दावा केला की, "यंत्रामध्ये कदाचित आधीच क्रमांक ६ वरून क्रमांक २ वर संजय सरावगी (भाजपा) यांना मतं ट्रान्सफर करण्याचं फिक्स केलं असेल. परंतु महाआघाडीला क्रमांक ६ वर ठेवल्यास परिस्थिती उघड झाली असती. घाईघाईत केलेली ही त्यांची पहिली तांत्रिक चूक होती."
पुष्पम प्रिया चौधरी यांनी त्यांच्या गृहनगर दरभंगा येथील मतमोजणीचं वर्णन "राजकीय आणि सांख्यिकीयदृष्ट्या अशक्य" असं केलं. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की "हजारो नातेवाईक असलेल्या दरभंगा येथे कमी मतं कशी मिळू शकतात?." त्यांनी पुढे असा आरोप केला की "मुस्लिम मतदारांचं वर्चस्व असलेल्या बूथवर भाजपा उमेदवाराला विक्रमी मतं मिळाली" हे देखील एका त्रुटीकडे निर्देश करतं.
चौधरी यांनी असाही दावा केला की, मतमोजणीच्या वेळी भाजपा उमेदवाराचे स्वतःचे मतमोजणी एजंटही निकालांनी स्तब्ध झाले होते, त्यांना आश्चर्य वाटलं की, अशा ठिकाणाहून मतं कशी येत आहेत जिथे त्यांनी यापूर्वी कधीही मतदान केलं नव्हतं. पण नियतीने यावेळी त्यांना उघडकीस आणण्याचे ठरवलं आहे. यावेळी त्यांनी इतक्या चुका केल्या आहेत आणि प्रत्येक बूथवर इतके पुरावे आहेत की त्यांचं सत्य उघड होईलच. पुष्पम प्रिया यांच्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.