तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 18:31 IST2025-11-16T18:30:33+5:302025-11-16T18:31:31+5:30
Bihar Election Lalu Prasad Yadav Family: लालू कुटुंबातील चार मुलींनी एकाचवेळी पाटणा सोडणे हा केवळ कौटुंबिक वाद नसून, तो पक्षाच्या नेतृत्वासंदर्भात तेजस्वी यादव यांच्यावर बहिणींनी टाकलेला बहिष्कार मानला जात आहे.

तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
बिहार विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रीय जनता दलाच्या दारुण पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील अंतर्गत संघर्ष आता विकोपाला गेला आहे. रोहिणी आचार्य यांनी आपले भाऊ तेजस्वी यादव आणि त्यांच्या दोन निकटवर्तीयांवर (संजय यादव आणि रमीज) अपमान केल्याचे आणि शिवीगाळ केल्याचे गंभीर आरोप करत कुटुंबाशी आणि राजकारणाशी संबंध तोडल्याचे जाहीर केल्यानंतर, आता लालूंच्या आणखी तीन मुलींनी पाटणा सोडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी आचार्य यांच्या पाठोपाठ लालू यादव यांच्या कन्या रागिणी यादव, चंदा यादव आणि राजलक्ष्मी यादव यांनीही तातडीने आपली मुले व कुटुंबीयांसह पाटणा येथील निवासस्थान सोडले असून, त्या दिल्लीला रवाना झाल्या आहेत.
लालू कुटुंबातील चार मुलींनी एकाचवेळी पाटणा सोडणे हा केवळ कौटुंबिक वाद नसून, तो पक्षाच्या नेतृत्वासंदर्भात तेजस्वी यादव यांच्यावर बहिणींनी टाकलेला बहिष्कार मानला जात आहे.
चिराग पासवान यांची मध्यस्थीची हाक
लालू कुटुंबातील या मोठ्या संघर्षावर लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते चिराग पासवान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्यांनी या कौटुंबिक वादावर मत व्यक्त केले. "राजकीय मतभेद असले तरी, लालूजींचे कुटुंब हे माझेही कुटुंब आहे," असे चिराग पासवान म्हणाले. एका मुलीला जेव्हा तिच्या माहेरी अपमानित वाटते, तेव्हा तिला किती दुःख होते, हे मी समजू शकतो. "मी प्रार्थना करतो की लालूजींचे कुटुंब लवकरच एकत्र यावे," असे आवाहन त्यांनी केले.
रोहिणी आचार्य यांनी आपल्या भावनिक पोस्टमध्ये, "मला माहेरून उपटून फेकले आहे" आणि "आत्मसन्मानाला धक्का पोहोचला" असे नमूद केले होते. रोहिणी आणि आता इतर तीन बहिणींच्या पाटणा सोडण्याच्या निर्णयामुळे आरजेडीच्या नेतृत्वावर आणि तेजस्वी यादव यांच्या कार्यशैलीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.