भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 21:48 IST2025-09-08T21:47:59+5:302025-09-08T21:48:34+5:30
"आज सरकारने अंगणवाडी सेविकांचे मानधनही वाढवले आहे. नितीश सरकार हे सर्व करत आहे, कारण जनतेची भीती आहे. पूर्वी त्यांना वाटायचे की..."

भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार अक्षरशः खैरातींचा पाऊस पाडताना दिसत आहेत. सोमवारी अंगणवाडी सेविकांचे मानधन सात हजारांवरून नऊ हजार करण्यात आले. गुलाबी बसेसच्या दुसऱ्या सेरीजला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यातच, जनसुरज पक्षाचे संयोजक प्रशांत किशोर यांनी नितीश कुमारांवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. नितीश कुमार भीतीपोटी खैरात वाटत आहेत. मात्र, जनतेने जनसुरजसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे पीके यांनी म्हटले आहे.
प्रशांत किशोर 'बिहार बदलाव यात्रे'च्या निमित्ताने सोमवारी पूर्णियातील रूपौली मदारसंघात एका जाहीरसभेसाठी पोहोचले होते. यानंतर, पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी नितीश कुमारांवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, "लोकांनी अजून मतदानही केलेले नाही, ते आता केवळ जनसुरजच्या सभांना येऊ लागले आहेत आणि नितीश कुमार यांनी वृद्धांचे पेन्शन ४०० वरून ११०० रुपये केले आहे. आशा वर्कर्सचे मानधन वाढवले आहे, १२५ युनिटपर्यंत वीज मोफत झाली आहे. विविध आयोगांचीही स्थापन करण्यात आली आहे.
पीके पुढे म्हणाले, "आज सरकारने अंगणवाडी सेविकांचे मानधनही वाढवले आहे. नितीश सरकार हे सर्व करत आहे, कारण जनतेची भीती आहे. पूर्वी त्यांना वाटायचे की, लोक लालूंच्या भीतीने त्यांना मतदान करतील. आता जनतेकडे जन सुराजच्या रूपाने एक पर्याय आहे, हे त्यांना दिसत आहे." एवढेच नाही तर, जनतेनेही जन सुराजसोबत येण्याचा निर्णय घेतला आहे," असेही ते म्हणाले.