‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 08:31 IST2025-10-18T08:30:09+5:302025-10-18T08:31:29+5:30
मधेपुरात राजकीय वातावरण तापले, विद्यमान आमदार प्रा. चंद्रशेखर यांनाच दिले पुन्हा तिकीट

‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले
एस. पी. सिन्हा
पाटणा : ‘राजद’चे नेते आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी दिवंगत शरद यादव यांचे चिरंजीव शांतनू यादव यांना पक्षाचे तिकीट दिले खरे मात्र, रात्री उशिरा त्यांचे तिकीट काढून घेत ते प्रा. चंद्रशेखर यांना देण्यात आले.
यानिमित्ताने मधेपुरातील राजकीय वातावरण तापले आहे. तिकीट परत घेतल्यानंतर शरद यादव यांचे पुत्र शांतनू यादव यांनी त्यांच्याविरुद्ध राजकीय कट रचला गेल्याचा आरोप केला आहे.
शांतनू यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. फोटोमध्ये त्यांचे वडील शरद यादव एका बाजूला आहेत व ते स्वतः दुसऱ्या बाजूला आहेत. मध्यभागी तेजस्वी यादव दिसत आहेत. तेजस्वी यांनी शांतनू यांचा हात वर उचललेला दिसत आहे. शांतनू यांनी म्हटले आहे की, माझ्याविरुद्ध राजकीय कट रचण्यात आला आहे. समाजवाद हरला आहे.
बी. पी. मंडल, शरद यादव आणि लालू प्रसाद यादव यांसारख्या नेत्यांनी येथील राजकारणाला एक नवीन दिशा दिली. या भागात समाजवादी चळवळ रुजली. येथील प्रत्येक निवडणूक विचारसरणीपेक्षा व्यक्तिमत्त्वांच्या संघर्षाचे व्यासपीठ बनली आहे.
... यांना देण्यात आला नकार
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सदस्य मदन मोहन झा यांच्या मुलालाही तिकीट नाकारण्यात आले. चारवेळा आमदार राहिलेले आणि ज्येष्ठ नेते अजित शर्मा हे चित्रपट अभिनेत्री मुलगी नेहा शर्मा हिच्यासाठी तिकीट मागत होते. मात्र, पक्षाने मुलीऐवजी वडील अजित शर्मा यांनाच तिकीट दिले. माजी आमदार अवधेश कुमार सिंह यांनी वजीरगंज मतदारसंघातून त्यांचा मुलगा शशी शेखर सिंह यांना तिकीट मागितले होते. शशी शेखर २०२० च्या निवडणुकीत पराभूत झाले होते. म्हणून पक्षाने त्यांच्या मुलाऐवजी त्यांचे वडील अवधेश सिंह यांना उमेदवारी दिली आहे.
‘राजद’चे डॅमेज कंट्रोल
जाणकारांचे असे मत आहे की, शरद यादव यांचे पुत्र शांतनु यादव यांना तिकीट नाकारणे हे, ‘राजद’ने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
‘राजद’ने शरद यादव यांचे पुत्र शांतनू यादव यांना मधेपुरातून तिकीट दिले; पण यामुळे विद्यमान आमदार डॉ. चंद्रशेखर यादव यांचे तिकीट कापल्याच्या वृत्ताने राजदच्या गोटात खळबळ उडाली.
त्यानंतर शांतनू यांचे तिकीट मागे घेत ते पुन्हा डॉ. चंद्रशेखर यांना देण्यात आले.
काँग्रेसने दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख समाप्त होण्याची वेळ जवळ येत असताना पक्षाने तरुण पिढीला प्राधान्य देण्याऐवजी अनुभवी आणि दिग्गज उमेदवारांवर विश्वास ठेवला आहे.
माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांच्या कन्या व लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार या त्यांच्या मुलासाठी अंशुल अभिजितसाठी तिकीट मागत होत्या. परंतु, पक्षाने त्यांना नकार दिला. माजी केंद्रीय मंत्री शकील अहमददेखील त्यांच्या मुलासाठी तिकीट मागत होते. त्यांनाही नकार मिळाला.
तारिक अन्वर यांची नाराजी
खासदार तारिक अन्वर यांनी तिकीट वाटपावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी प्रश्न केला की ३०,००० पेक्षा जास्त मतांनी पराभूत झालेल्या उमेदवाराला पुन्हा उमेदवारी का देण्यात आली. तर केवळ ११३ मतांनी पराभूत झालेल्या माजी आमदार गजानंद शाही यांना तिकीट नाकारण्यात आले.